
नीट पेपरफुटीनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. नीट परीक्षा सुरक्षित पार पडावी यासाठी सरकार कठोर उपाययोजना राबवत आहे. याच उपाययोजनेचा भाग म्हणून नीट परीक्षा सुरळीत पार पडेपर्यंत सरकारने ‘मिशन लॉकडाऊन’ राबवले आहे. नीट परीक्षेचे पेपर सेट करणाऱ्या तज्ज्ञांना अज्ञात ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व पेपर सेट करणाऱ्या तज्ज्ञांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 21 रोजी परीक्षा संपेपर्यंत हा लॉकडाऊन लागू राहिल. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि वैयक्तिक संपर्क साधने वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच इंटरनेट आणि बाहेरील लोकांशी होणाऱ्या संपर्कावर कडक नियंत्रण ठेवले जात आहे. केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जात असून, प्रत्येक येण्या-जाण्याची नोंद ठेवली जात आहे.
21 जून रोजी होणारी ही परीक्षा ‘पेन-अँड-पेपर’ पद्धतीने दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. नीट परीक्षेचे साहित्य पोहचवण्यासाठी हवाई दलाच्या विमानांचा वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान, मे महिन्यात झालेली नीट-यूजी परीक्षा, पेपरफुटीच्या प्रकरणामुळे रद्द करावी लागली. या पेपरफुटीमुळे देशभरातील 22 लाखांहून अधिक उमेदवारांची चिंता वाढली.



























































