
इंडिया आघाडीची सोमवारी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित होते. या पक्षांचे पाच महत्त्वाच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे. आता इंडिया आघाडीने एकजुटीची मुठ आवळत मोदी सरकारविरोधात रणनीती ठरवण्यावर एकमत झाले आहे. या बैठकीबाबत काँग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
खरगे म्हणाले की, या बैठकीत सर्व पक्षांचे अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे SIR आणि निवडणूक प्रक्रियांमध्ये झालेली हेरफार आहे. याबाबत सरन्यायाधीशांना लवकरच एक पाठवण्यात येणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे NEET आणि CBSE परीक्षेतील गोंधळ आणि शिक्षणप्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याचा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. याची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व पक्ष एकमताने करत आहोत. या परीक्षांमधील गोंधळ म्हणजे लाखो विद्यार्थ्यांसोबत झालेला विश्वासघात आहे, त्याविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली आहे, असे खरगे म्हणाले.
देशाची आर्थिक स्थिती, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर आम्ही आवाज बुलंद करणार आहोत. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरही आण्ही लक्ष केंद्रीत करत आहोत. सध्याची स्थिती बघता केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक घेण्याची गरज आहे. सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतल्यास त्यात आम्हाला हे सर्व मुद्दे त्यांच्यासमोर मांडता येणार आहेत.
इंडिया आघाडीची प्रत्येक दोन महिन्यात बैठक घेण्यात यावी, यावरही सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. यापुढील बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबादमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तसेच आगामी पावसाळी अधिवेशनात संसदीय समन्वय योग्य प्रकारे राखण्यात येणार आहे. दररोज विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. याबाबत सर्व पक्षांचे एकमत झाले असून याबाबत सर्व एकत्रित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



























































