
आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे सर्पदंश झालेल्या आतिफ खान या तीन वर्षीय चिमुकल्याला आज आपला जीव गमवावा लागला. आतिफच्या उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात बाल अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) तसेच अन्य अत्याधुनिक आरोग्य सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र खासगी रुग्णालयात नेत असतानाच चिमुकल्या आतिफचा जीव गेला.
पालघर शहरातील भरवाडपाडा येथे आशिक खान कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा आतिफ घरच्या परिसरात खेळत असताना त्याला सर्पदंश झाला. तातडीने त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याची प्रकृती चिंताजनक झाली. मात्र आतिफच्या उपचारासाठी सरकारी दवाखान्यात आयसीयू आणि इतर अत्याधुनिक आरोग्य सुविधा नव्हत्या. अखेर आतिफला खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. खासगी रुग्णालयात नेत असतानाच आतिफचा जीव गेला. या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त होत आहे.
पालघर जिल्हा निर्माण होऊन १२ वर्षे उलटली, मात्र आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जिल्ह्याचे ‘बारा’ वाजले आहेत. एनआयसीयू, आयसीयू, विषोपचारासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.



























































