शिवसेनेचा दणका! शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर गोदावरी नदी आणि रामकुंडाच्या साफसफाईला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकसहीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी श्रद्धास्थान असलेल्या पवित्र गोदावरी नदीत गटाराचं पाणी सोडले जात होते. त्या विरोधात 8 जून रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी व शिवसैनिकांनी गोदावरी नदिपात्रात उतरून पाहणी केली व प्रशासनाला जाब विचारला. शिवसैनिकांच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली असून नाशिक महानगरपालिकेकडून गोदावरी नदी आणि रामकुंडाच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे.

या घटनेवरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिक महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे. ”सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर असताना, प्रशासनाची ही बेपर्वाई नाशिककरांच्या आणि भाविकांच्या आरोग्याशी खेळणारी होती” अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला फटकारले.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून आदित्य ठाकरे यांनी ”यंत्रणेने गोदामाईच्या स्वच्छतेबाबत कायम सतर्क राहून, वेळीच उपाययोजना राबविणे गरजेचे आहे”, असे देखील या पोस्ट मधून सांगितले आहे.

”नाशिकमधील पवित्र गोदामाईच्या प्रदूषणाविरोधात शिवसैनिकांनी आणि नगरसेवकांनी आंदोलन करत, सुस्त यंत्रणेला जाब विचारला होता. त्यांच्या ताकदीचा दणका एवढा जोरदार होता की, प्रशासनाने आता तातडीने हालचाली करत गोदावरी नदी आणि रामकुंडाच्या साफसफाईला सुरुवात केली आहे.सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर असताना, प्रशासनाची ही बेपर्वाई नाशिककरांच्या आणि भाविकांच्या आरोग्याशी खेळणारी होती. यंत्रणेने गोदामाईच्या स्वच्छतेबाबत कायम सतर्क राहून, वेळीच उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. नाशिकमधील सर्व शिवसैनिक आणि नगरसेवकांनी उठवलेल्या आवाजामुळे आणि एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी X वर शेअर केले आहे.