स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, नवख्या कृष्णा नागेश पाटीलांनी फोडला महायुतीच्या उमेदवाराला घाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत कागदोपत्री महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय सुरवातीला निश्चित मानला जात असला, तरी राजकीय पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडींमुळे निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांनी मात्र सत्ताधारी भाजपाला घाम फोडला आहे. या निवडणूकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून ते ‘जायंट किलर’ ठरणार याची उत्सुकता वाढली आहे.

४५२ मतदार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था नांदेडच्या निवडणुकीत चुरच वाढली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक मतदार नांदेडमधून असून १०८ मतदार यात आहेत. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कृष्णा नागेश पाटील आष्टीकर, भाजपाचे अमरनाथ राजुरकर आणि वंचितचे प्रशांत इंगोले यांच्यात लढत आहे. सुरूवातीला या मतदार संघात काँग्रेसने रामदास पाटील सुमठानकर यांना उमेदवारी दिली मात्र पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार रविंद्र चव्हाण यांनी संवाद साधून ही जागा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून घेतली त्यामुळे सुरूवातीला सोपी वाटणारी ही निवडणूक आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारामुळे चांगलीच अटी तटीची ठरणार आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात विरोधकांना घाम फोडणार्‍या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आपला विजय खेचून आणला. आष्टीकर यांचे वेगवेगळ्या पक्षात चांगले संबंध आहेत तर नाते संबंधाच्या जोरावर ते या निवडणूकीत चमत्कार घडवून आणतील. जवळपास २०० मतदारांशी त्यांचा संपर्क झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेण्याचे ठरवले असून आपल्या राजकिय खेळीनुसार ते चमत्कार घडवून आणतील असा विश्वास व्यक्त होत आहे. सावध पवित्रा घेत अमरनाथ राजुरकर यांनी भाजपासह मित्र पक्षांच्या काही नगरसेवकांना अज्ञात स्थळी पाठविले आहे. तर दोलायमान आवस्थेत असलेल्या नगरसेवकावर त्यांनी पाळत ठेवली आहे. या निवडणुकीत एमआयएमची भुमीका महत्वाची ठरणार आहे.

मात्र राजकारणात केवळ आकडेच निर्णायक ठरत नाहीत, हे अनेक निवडणुकांनी सिद्ध केले आहे. नांदेडच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत उमेदवारी वाटप, पदांचे वितरण आणि निर्णय प्रक्रियेत काही मोजक्या व्यक्तींचे वर्चस्व असल्याची भावना भाजपातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे बोलले जाते. विशेषतः प्रत्येक निवडणुकीत एकाच गटाला संधी मिळत असल्याने नाराजीचा सूर दबक्या आवाजात का होईना, पण ऐकू येत आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जिल्ह्यात मजबूत संघटन उभारले असले तरी काही स्थानिक पदाधिकारी आणि मतदार प्रतिनिधींमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीत मतदान गुप्त पद्धतीने होत असल्याने नाराज मतदार आपली भूमिका मतदानातून व्यक्त करू शकतात. त्यामुळेच आष्टीकर यांची उमेदवारी अनेकांच्या दृष्टीने ‘क्रॉस व्होटिंग’साठी उपलब्ध पर्याय म्हणून पाहिली जात आहे.

उमेदवारी वाटप, पक्षातील पदांचे वितरण आणि निर्णय प्रक्रियेत काही मोजक्या नेत्यांचे वाढते वर्चस्व यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. हीच नाराजी मतदानाच्या दिवशी गुप्त मतदानाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे एकाच मंचावर दिसले असले तरी त्यामागे संघटनात्मक एकजूट दाखविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काही आमदारांची अनुपस्थिती महायुतीतील अंतर्गत धुसफूस अधोरेखित करणारी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, जर महायुतीतील नाराज लोकप्रतिनिधींनी पक्षीय आदेशाला छेद देत मतदान केले तर निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक सदस्यांचे आष्टीकर यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंध आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे त्यांना अनपेक्षित पाठबळ देऊ शकतात.