FIFA World Cup 2026 – मेस्सी का रोनाल्डो? कोण आहे कोणावर भारी? आकडेवारी काय सांगते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

FIFA World Cup 2026 चा थरार 11 जूनपासून सुरू होत असून, फुटबॉल प्रेमींची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांसारख्या दिग्गजांना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच तब्बल 48 संघ जेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळतीये. रोनाल्डो आणि मेस्सी यांचा चाहता वर्ग संपूर्ण जगात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर साऱ्या जगाच्या नजरा आहेत.

रोनाल्डो आणि मेस्सी यांची फिफा वर्ल्ड कपमधील कामगिरी पाहिल्यास मेस्सीने आतापर्यंत सर्वाधिक 26 सामने खेळले आहेत, तर रोनाल्डोने 22 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. गोल आणि असिस्टच्या बाबतीतही मेस्सीने आघाडी घेतली आहे. मेस्सीच्या नावावर 13 गोल आणि 8 असिस्टसह एकूण 21 गोलमधील योगदान आहे, जे रोनाल्डोच्या 10 (8 गोल, 2 असिस्ट) च्या आकड्यापेक्षा दुप्पट आहे.

वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम लिओनेल मेस्सीच्या नावावर आहे. मेस्सीने तब्बल 10 वेळा हा बहुमान पटकावला आहे, तर रोनाल्डोला केवळ एकदाच हा पुरस्कार मिळाला आहे. इतकेच नव्हे तर, मेस्सी हा जगातील एकमेव असा खेळाडू आहे ज्याने 2014 आणि 2022 मध्ये दोनदा ‘गोल्डन बॉल’ (टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू) पुरस्कार जिंकला आहे. फिफा वर्ल्ड कपच्या एकाच आवृत्तीत गोल्डन बॉल जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल योगदान देण्याच्या बाबतीत मेस्सीने अर्जेंटिनाचेच महान खेळाडू दिएगो माराडोना यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीतील सर्वात मोठा फरकबाद फेरी स्टेजच्या सामन्यांमध्ये दिसून येतो. मेस्सीने आपल्या वर्ल्ड कप कारकिर्दीत नॉकआउट सामन्यांमध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत 6 गोल केले आहेत आणि 6 असिस्ट दिले आहेत, म्हणजेच तो थेट 12 गोलमध्ये भागीदार राहिला आहे. दुसरीकडे, पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डोला वर्ल्ड कपच्या नॉकआउट सामन्यांमध्ये आतापर्यंत एकही गोल किंवा असिस्ट करता आलेला नाही. रोनाल्डोने केलेले सर्वच्या सर्व 8 गोल हे केवळ साखळी फेरीतील सामन्यांमध्ये आले आहेत.