
अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपले असून आता लवकरच दोन्ही देशांत शांतता करार होणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर जागतिक शेअर बाजारासह हिंदुस्थानी शेअर बाजारातही शुक्रवारी जबरदस्त तेजी दिसून आली. तसेच सोन्याचांदीच्या किमतीनीही मोठी उसळी घेतली आहे. मात्र, आगामी काही दिवसात सोनेचांदीच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आखाती युद्धामुळे सोने आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. त्या बऱ्याच काळापासून एका मर्यादित कक्षेत व्यवहार करत आहेत. सोने सध्या त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा २५ टक्के स्वस्त आहे. मात्र, आता या दरांमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या वर्षी जानेवारीमध्ये सोन्याने प्रति औंस ५५९५ डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला होता. तेव्हापासून त्यात घसरण दिसून आली आहे. ते त्याच्या विक्रमी उच्चांकावरून सुमारे २५ टक्के ने घसरले आहे. या घसरणीमुळे ज्यांनी विक्रमी उच्चांकावर सोने खरेदी केले होते आणि आता तेजीची अपेक्षा करत होते, त्यांना मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
साप्ताहिक आकडेवारीनुसार, सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस ४,२२२ डॉलरवर स्थिर होता. कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर (MCX) तो 1.17 टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,५०,६७५ रुपयांवर बंद झाला.
सध्या सोन्यासमोर दोन आव्हाने उभी राहत आहेत. पहिले म्हणजे, यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. शिवाय, डॉलरमधील वाढ हीदेखील सोन्यासाठी चांगली बातमी नाही. या दोन घटकांमुळे सोन्यावर आणखी दबाव येऊ शकतो, असे मत तज्ञांनी वर्तवले आहे.
आखाती देशातील तणाव संपल्यावर आणि कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत खाली आल्यावरच सोने आणि चांदीच्या किमती वाढू शकतात. सध्या तेलाच्या किमती सध्या ९० डॉलरच्या आसपास आहेत. सोन्यातील सततच्या घसरणीमुळे अल्पावधीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. सोन्याची किंमत ३,८५०-४,००० डॉलर प्रति औंसपर्यंत घसरू शकते, कारण यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते, असे मत तज्ञांनी वर्तवले आहे.




























































