
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचे पुतणे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घरावर कोलकाता पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास छापा टाकला. कोलकाता पोलिसांनी रात्री 3 च्या सुमारास कुलूप तोडून घरात घुसखोरी करत छापेमारी केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारात गुन्हे दाखल होत आहे. शुक्रवारी मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोलीस पथक पेंद्रीय दलाच्या जवानांसह पोहोचले होते. पोलीस अधिकारी आत गेले, जवान गेटबाहेर पहारा देत राहिले. शोधमोहीम जवळपास चार तास चालली होती. ही छापेमारी नेमकी कोणत्या प्रकरणामध्ये करण्यात आली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु कोलकाता पोलिसांसोबत पश्चिम मेदिनीपूर जिह्याचेही पोलीस पथक होते. पश्चिम मेदिनीपूरमधील सालबोनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणासंदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तेथे कोणी गुन्हा दाखल केला, त्यात अभिषेक आरोपी आहेत की नाही, याबद्दल पोलीस सूत्रांनी काहीही सांगितले नाही. दरम्यान, शनिवारी सकाळी घराबाहेर पडल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱयांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी प्रत्येक खोलीची झाडाझडती घेतली.
तृणमूल आमदार मदन मित्रांच्या घरी ईडीच्या धाडी
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या एकूण 8 ठिकाणी ईडीने धाडी मारल्या. शनिवारी सकाळी पेंद्रीय तपास यंत्रणा मदन मित्रा यांच्या विविध ठिकाणी पोहोचली. ईडीने ही कारवाई माजी मंत्री मदन मित्रा यांच्यावर महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी केली, असे सांगितले. नगरपालिका भरती घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणात तृणमूल नेते सुजीत बोस यांना अटक करण्यात आली. तसेच रथिन दास यांची चौकशी केली होती.
























































