कॉमेडी शोमधील वादग्रस्त विधान भोवले; केईएम रुग्णालयातील सेजल पवार सक्तीच्या रजेवर, प्रणित मोरेने मागितली माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉमेडियन प्रणित मोरे याच्या एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी समाजमाध्यमांवर चौफेर टीकेची धनी ठरलेली आणि मुंबईतील केईएम रुग्णालयात एमबीबीएससचे शिक्षण घेत असलेली सेजल पवार हिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय केईएम प्रशासनाने घेतला आहे. या 15 दिवसांत सेजल पवारला कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जावर करण्यात आला आहे.

केईएम प्रशासनाने सेजल पवार हिच्या पालकांशी वरिष्ठांनी चर्चा केली. सेजल पवार प्रकरणात सखोल चौकशीची गरज असून त्यासाठी पाच सदस्य समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे. सात दिवसात समिती आपला अहवाल सोपवणार. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल. विद्यार्थिनी ही अद्याप वैद्यकीय शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी असल्याने तिच्याबाबतच्या सर्व बाबी नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार हाताळल्या जातील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डॉ. सेजल पवार हिला चौकशी समितीसमोर तिची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सेजल हिच्या व्हिडीओतील विधानांमुळे संस्थेच्या प्रतिमेवर झालेल्या परिणाम यासाठीची तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाच सदस्यांच्या समितीत वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचाही समावेश असणार आहे. दरम्यान, कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सेजल पवारने केईएम रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केला होता.

प्रणित मोरेने मागितली माफी

वादग्रस्त व्हिडीओप्रकरणी चौफेर टीका होत असल्याने स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे याने माफी मागितली आहे. प्रणितने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून ही माफी मागितली आहे. मला ही गोष्ट काही दिवसांपूर्वीच बोलायची होती. पण माझं इन्स्टाग्राम सस्पेंड झालं होतं. तुम्ही सर्वांनी माझा क्राऊड वर्कचा व्हिडीओ पाहिला असेल. या व्हिडीओमुळे माझा लोकांकडून तिरस्कार केला जात आहे. मला असं वाटतं की, हा तिरस्कार मी  डिझर्व्ह करतोय. कारण त्या तरुणासोबत जेव्हा मी क्राऊडवर्क करत होतो. तेव्हा त्यानं बऱ्याच अपमानास्पद गोष्टी बोलल्या. सर्व जण त्यावर हसत होते. मी देखील भावनेच्या भरात वाहून गेलो होतो. तेव्हा माझ्याकडून चूक झाली. जे कुणी यामुळे दुखावले गेले असतील, त्यांच्या सगळ्यांची मी माफी मागतो मला एक संधी द्यावी, मी एक चांगला माणूस बनून दाखवेन. मी माझ्या स्वतःवर आणि माझ्या कॉन्टेंटवर काम करेन, असे तो म्हणाला.