
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या चार हजार ईव्हीएम मशीन सरकारी इमारतीमध्ये जळून खाक होतातच कशा, असा संतप्त सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. निकालानंतर या ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे या मशीन जळाल्या नाहीत, तर भाजप सरकारने या मशीनला आग लावून सर्व पुरावे नष्ट केले आहेत, असा घणाघात त्यांनी केला.
खासदार संजय राऊत शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये जो निकाल लागला आहे, तो कोणालाही मान्य नाही. ममता बॅनर्जी यांचा एवढा मोठा पराभव होऊ शकत नाही. परंतु जो निकाल लागला आहे तो कसा लागला, यावर कालच्या घटनेमुळे आमचा विश्वास बसत आहे. ही देशासाठी सर्वात गंभीर बाब असून, आता निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? या देशात जोपर्यंत मोदी-शहा यांचे राज्य आहे, तोपर्यंत हे चालत राहणार,’ अशी टीकाही त्यांनी केली. ‘पक्ष फोडणे, माणसे फोडणे, माणसे विकत घेणे, ही भाजपची विकृती आहे. जेव्हापासून या देशात मोदी-शहा यांचे राज्य आले आहे, तेव्हापासून राजकारणातील या विकृतीने कळस गाठला आहे, असे ते म्हणाले
अर्थखाते मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यातच शहाणपण
अर्थखात्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर खासदार राऊत म्हणाले, ‘हा सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, अर्थखाते सांभाळेल, असा सक्षम माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत नाही. त्यामुळे अर्थखाते मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवणे, यातच राज्याचे शहाणपण आहे.’
























































