
दोन लाखांची रक्कम परत केली नाही म्हणून पाच जणांनी मिळून एका तरुणाला जबरदस्तीने एम.एम. रेसिडेन्सी येथील एका खोलीत डांबून ठेवले. तसेच त्याला नग्न फिरवून अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेऊन 24 तासांत त्यांना ताब्यात घेतले.
सचिन रणपिसे (33) असे तक्रारदाराचे नाव आहे. आठ जूनच्या सायंकाळपासून ते 10 तारखेच्या सायंकाळपर्यंत त्याला एम.एम. रेसिडेन्सी येथील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. तेथे त्याला चामडय़ाच्या पट्टय़ाने हातावर, डोक्यावर, पाठीवर बेदम मारहाण करून दुखापत केली. तसेच आरोपी अब्दुल्ला याचा एक वकील मित्र याने शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपींनी सचिनला अन्नपाणी न देता एम.एम. रेसिडेन्सी पॅसेजमध्ये नग्न अवस्थेत फिरवून अमानुष वागणूक दिली. हा प्रकार समोर येताच डोंगरी पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून अब्दुल्ला शौकत भुसानी, जुनेद कायमउद्दीन खान, मोहम्मद सात सुभान पठाण, अराफत हसाम खानानी, साहिल स्वपन शेख या पाच आरोपींना 24 तासांत डोंगरी पोलिसांनी शोधून काढले.
























































