
‘रायगड जिह्याचे एक वैशिष्ट्य आहे. अडचणी, संकटे असली, तरी त्यावर मात करून येथील लोक पुढे जातात. रामशेठ ठाकुर हे असेच कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जो समाजसेवेचा दृष्टिकोन आहे, त्यामागे आम्हा लोकांची सदैव साथ राहील,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-खासदार शरद पवार यांनी येथे केले.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकुर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार बोलत होते. सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शकुंतला ठाकुर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष-खासदार नितीन पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार विश्वजीत कदम, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे, अरुण कडू-पाटील, डॉ. राजेंद्र सरकाळे, अंकुश काकडे, आमदार प्रशांत ठाकुर, परेश ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानी होते.
खासदार शरद पवार म्हणाले, ‘रामशेठ ठाकुर यांच्याबद्दल आमच्या मनात कायमच आदराची भावना आहे. त्यांचे आयुष्य कष्टात गेले. रायगड जिह्यातील सामान्यांना संघटित करून त्यांचा विकास साधायचा, हे व्रत नारायण राघव पाटील यांच्यासारख्या व्यक्तींनी चालवले, तेच व्रत रामशेठ ठाकुर पुढे चालवत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देऊन जिह्याचा चेहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही, तर ते शांत बसले नाहीत. जमेल तिथे रंजल्या-गांजल्यांना आधार देण्याचे काम त्यांनी केले. रायगड जिह्यातील गरीब मुलांना ज्ञानदानाची कवाडे खुली करण्यासाठी त्यांनी मुक्तहस्ते मदत केली. त्यांना ‘रयत’मध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. स्वतःच्या कष्टाने त्यांनी उद्योग उभा केला. हजारो लोकांना उभे केले. रयत शिक्षण संस्थेसोबत असलेले नाते त्यांनी जपले आहे. अनेकदा त्यांनी देणगी दिली, पण ‘नाव जाहीर करू नका, रक्कम जाहीर करू नका,’ असे ते म्हणत असत. ते ज्या पद्धतीने रयत शिक्षण संस्थेच्या आणि आम्हा सर्वांच्या मागे राहिले, त्याच पद्धतीने आम्हीही त्यांच्या पाठीशी उभे राहू,’ असे शरद पवार यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्थेमधून शिकून गेलेले लाखो विद्यार्थी असतील, पण शिक्षण संस्थेसाठी मदतीचा झरा बनलेले रामशेठ ठाकुर हे एकमेव ठरले आहेत. अनेकजण मंदिरे बांधण्यासाठी पैसा खर्च करतात, पण रामशेठ ठाकुर यांच्यासारखी माणसे ज्ञानमंदिरे उभारण्यासाठी कोटय़वधी रुपये देतात. दानशूरता त्यांच्यामध्ये असल्यामुळे हे शक्य झाले आहे. रयत शिक्षण संस्थेसाठी रामशेठ ठाकुर हे आधुनिक ‘गाडगेबाबा’ ठरले आहेत.’
‘रयत’ला मदत करत राहणार – ठाकुर
रयत शिक्षण संस्थेमध्ये मी गेली 52 वर्षे घडतोय. शिवाजी कॉलेजमधील शिक्षण हा माझ्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार अनेक वेळा माझ्या पाठीशी राहिले. संसदेत काम करत असतानादेखील त्यांनी मला मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्था मला अजूनही घडवत आहे. हे घडवणे थांबलेले नाही. कर्मवीर विद्यापीठासाठी पाच कोटी दिले असून, विद्यापीठाचे काम सुरू करावे. आणखी पाच कोटी देतो,’ असा शब्द रामशेठ ठाकुर यांनी दिला.
























































