
मराठीला दुय्यम स्थान देत घंटागाडीवरून हिंदीतून संदेश देणाऱ्या पेण नगरपरिषदेला मुंबई महापालिकेचे निवृत्त अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे खडबडून जाग आली. पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजभाषेला मिळत असलेल्या दुय्यम स्थानाबाबत आवाज उठवताच पेण नगरपरिषदेने घंटागाडीवर हिंदीऐवजी मराठी भाषेत संदेश देणे सुरू केले आहे. त्यामुळे मराठीचा आवाज आता आळीआळीत आणि घरोघरी पोहचू लागला आहे.
मराठीला प्राधान्य देण्याऐवजी पेण नगरपरिषदेच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांवर हिंदीतून संदेश वाजत होता. याची गंभीर दखल मुंबई पालिकेचे निवृत्त अभियंता जीवन पाटील यांनी घेतली. त्यांनी पेणचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना याबाबत निवेदन देऊन मराठीसोबत दुजाभाव करू नये अशी मागणी केली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग यांनाही निवेदन देऊन लक्ष वेधले.
मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि संस्कृती
पेणसारख्या मराठी भाषिक शहरात स्वच्छता जागृतीचे संदेश हिंदीतून दिले जाणे हे मराठी माणसाचे दुर्दैव आहे. जनतेपर्यंत पोहचणारा प्रत्येक संदेश मातृभाषेत असावा अशी मागणी त्यांनी केली होती. पाटील यांच्या मागणीला विविध वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिल्यामुळे जनमत तयार झाले. प्रशासनावर सकारात्मक दबाव निर्माण झाला आणि अल्पावधीतच पेण नगरपरिषदेने हिंदीऐवजी मराठी भाषेतील संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली. मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि स्वाभिमान आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी जनतेशी संवाद साधताना मराठीला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. पेण नगरपरिषदेचा निर्णय हा मराठी भाषेच्या सन्मानाचा आणि जनभावनांच्या आदराचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया जीवन पाटील यांनी दिली.

























































