कार्यकर्त्यांना बाजारभाव, लोकप्रतिनिधींना हमीभाव! विचारांशी निष्ठा संपवण्याचा प्रयत्न, संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कार्यकर्त्यांना बाजारभाव आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना हमीभाव देऊन विकत घेण्याचे राजकारण सध्या देशात सुरू आहे. विचारांशी असलेली निष्ठा दुर्मिळ होत चालली आहे. लोकप्रतिनिधींना विकत घेण्याच्या या राजकारणात ‘कार्यकर्ता’ ही जमातच संपवण्याचा प्रयत्न होत आहे,’ अशी टीका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली.

निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ठसा उमटविणारे कै. धनंजय थोरात यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ लेखक नामदेव भोसले, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक पटेल आणि प्रसिद्ध संगीतकार सलिल कुलकर्णी यांना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी आमदार व ‘धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठान’चे अध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, निवृत्त अपर पोलीस महासंचालक अशोक धिवरे, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर,शिवसेना शहरप्रमुख वसंत मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. सलील कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री रेखा कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, ‘धनंजय थोरात हे असे कार्यकर्ते होते, जे आयुष्यभर काँग्रेस पक्षात राहिले, केवळ एकदाच नगरसेवक झाले; पण कधीही कुठल्या आमिषाला बळी पडले नाहीत. आज पश्चिम बंगाल असो वा देशातील इतर भाग, विरोधी विचार संपवण्यासाठी कार्यकर्त्यांना विकत घेतले जात आहे, नाहीतर तुरुंगात टाकले जात आहे. ज्या विचारात तुम्ही मोठे झालात, तो विचार सोडून लोक कसे काय जाऊ शकतात? ‘निष्ठा’ या शब्दाची व्याख्याच बदलण्याची वेळ आली आहे.’

देशातील आर्थिक फसवणुकीवर बोट ठेवत ते म्हणाले, ‘चोरी केली म्हणून पारधी समाजाला पकडून नेणारे प्रशासन १५ लाख कोटी रुपये चोरून देशाबाहेर पसार होणाऱ्या राजेश मेहतासारख्या लोकांवर काय कारवाई करणार? गेल्या १२ वर्षांत बँकांचे १४ लाख कोटी रुपये बुडवणाऱ्यांचे कर्ज माफ केले जाते; पण गुन्हेगार मात्र नेहमी सामान्य गरीब लोकच ठरतात. आज जे लोक सुपात आहेत, त्यांनी लक्षात ठेवावे की, तुमची पुढची पिढी उद्या हे सर्व भोगणार आहे. म्हणूनच तुमच्या पुढच्या पिढीला जर मानाने जगायचे असेल, तर आज निर्भयपणे बोलायला शिका. जिथे आहात, ज्या क्षेत्रात काम करता, तिथून आवाज उठवला पाहिजे.’ राम मंदिर प्रकरणातील दानपेटीच्या कथित चोरीवरून आणि ईव्हीएममधील गोंधळावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले.

चिमटे नाही, आता थेट हल्ले करण्याची गरज!

कार्यक्रमात निवृत्त पोलीस अधिकारी अशोक धिवरे यांनी आपल्या भाषणात ‘चिमटे काढत राहा…’ असा सल्ला दिल्याचा उल्लेख करीत खासदार संजय राऊत यांनी मिश्कील, पण तितकीच परखड प्रतिक्रिया दिली. ‘अशोक धिवरे यांनी काही सूचना केल्या. चिमटे काढा, असे ते म्हणाले. पण चिमटे काढणे हे काम आम्हाला कधी जमलेच नाही. आम्ही थेट हल्ले करणारी माणसे आहोत. देशातील सध्याची परिस्थिती पाहता, केवळ चिमटे काढून चालणार नाही. या देशाला चिमट्यांची गरज नाही, तर थेट हल्ल्यांची गरज आहे,’ असे संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

अशोक धिवरे म्हणाले, ‘पुण्यात पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर जे काही मित्र झाले, त्यात धनंजय योरात हे अग्रक्रमावर होते. आज सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रांतील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत,’ अशी खंत व्यक्त करीत त्यांनी यावेळी कवी यशवंत मनोहर यांची एक कविताही वाचून दाखवली. काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांनी कै. धनंजय व्योरात यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक कर्तृत्वाचा उल्लेख केला. ‘धनंजय केवळ राजकारणात नव्हते, तर राजकारणाचे समाजकारण करणारे ते कार्यकर्ते होते.

तसेच त्यांचे वडील यांचाही सामाजिक कार्यात मोठा वाटा होता,’ असे त्यांनी सांगितले. यावेळी मुश्ताक पटेल, रेखा कुलकर्णी, मोहन जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. युवराज शहा यांनी आभार मानले.

आम्हाला अजूनही ओळख नाही – नामदेव भोसले

पुरस्काराला उत्तर देताना लेखक नामदेव भोसले यांनी पारधी आणि आदिवासी समाजाच्या वेदना मांडल्या. ‘मुळा-मुठा नदीच्या कडेला माझा जन्म झाला. रात्रंदिवस पोलिसांची भीती पाठीवर बाळगत आम्ही एखाद्या जनावरासारखे जीवन जगलो. आज मला या मंचावर गुदमरल्यासारखे होत आहे. कारण आमचा समाज आजही किड्या-मुंग्यांसारखा जगत असून, आम्हाला अजून साधे ओळखपत्रही मिळालेले नाही. बिबट्या आणि सिंहाची गणना केली जाते, पण पारधी-आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला जात नाही?’ अशा शब्दांत नामदेव भोसले यांनी आपली खंत व्यक्त केली.