
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू होते. आज मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर रोहित यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
22 जूनच्या आधी मुंबईत बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे. माझ्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक आहे. शेतकऱयांना न्याय देण्याचा विचार सरकार करत आहे. अटींसंदर्भात काय करता येईल याबाबत समितीकडे जावे लागेल, असे महाजन यांनी सांगितल्याचे रोहित यांनी नमूद केले.
शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी मिळावी ही ठाम मागणी आहे. यात कोणतेही राजकारण नाही. शासन निर्णयातील अटी पाहता अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. बुलढाण्यात याच मागणीसाठी रविकांत तुपकर हेसुद्धा आंदोलन करत आहेत. त्यांच्याशीही सरकारने बोलले पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले. येणारं वर्ष कठीण आहे. यंदा पाऊस कमी पडणार आहे. पिके जळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं कर्जमाफी योजना अटीशिवाय लागू करून दिलासा दिला पाहिजे. त्याचबरोबर 1 रुपयामध्ये जी पिक विमा योजना होती ती योजना परत सुरू करावी, अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे.
तीन दिवसांपासून अन्नत्याग करणाऱया रोहित यांची प्रकृती आज खालावली होती. त्यांचे कुटुंबीय आज पंढरपुरात दाखल झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना रोहित यांच्याशी चर्चा करण्यासाठी पंढरपुरात पाठवले.

























































