
हदगाव तालुक्यातील मनुला बुद्रुक येथील सिद्धांत व त्याची पत्नी शुभांगी यांनी आपल्या पोटच्या दोन मुलांना रात्रीच्या वेळी विषारी औषध पाजले व हा गुन्हा लपवण्यासाठी २४ तास दार लावून घरातच बसले. दोन्ही मुलांवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मुलगा सुमित सिद्धांत भालेराव वय पाच वर्षे याचा मृत्यू झाला. तर मुलगी साक्षी भालेराव वय सात वर्षे ही मृत्यूशी झुंज देत आहे.
मनूला बुद्रुक येथील नंदू भालेराव यांच्या कुटुंबात एकूण सात सदस्य आहेत. त्यांचा मुलगा सिद्धांत भालेराव (वय ३२) वर्षे याचे लग्न आठ वर्षापूर्वी झाले असून ते शेतमजुर म्हणून काम करून उदरनिर्वाह करतात. त्याना मुलगी साक्षी वय सात वर्षे व मुलगा सुमित वय पाच वर्षे आहे. ते वडिलांपासून वेगळ्या घरात राहतात सहकुटुंब राहण्यासाठी स्वतंत्र खोली आहे. १४ जून रोजी रविवारी सिद्धांत हा निवघा (बा) येथील आठवडी बाजार करून आला. आपल्या खोलीत मुलांना व पत्नी सोबत रात्री जेवण करताना कोणत्यातरी पेयामध्ये विष कालवून दोन्ही मुलांना पिण्यासाठी दिले. ते सर्व जेवून झोपले. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी सात वाजताचे दरम्यान नेहमीप्रमाणे त्याचे आई,वडील व बहीण मजुरीचे काम करण्यासाठी गेले. जाताना मुलगा सिद्धांत याचे घर बंद असल्याचे दिसले. सायंकाळी ते घरी कामावरून परत आले असता मुलाचे घर बंद दिसले. त्यानंतर वडील नंदू भालेराव यांनी मुलाला आवाज देऊन घराचे दरवाज्यावर थाप मारली असता मुलगा सिद्धांथ याने दरवाजा उघडला. त्याची मुलगी साक्षी ही उलटी करीत होती व मुलगा सुमित हा बेशुद्ध अवस्थेत होता, तेव्हा नंदू भालेराव यांनी सिंद्धाथ यास मुलांना काय झाले विचारले असता त्याने मुलांना उलटी होत आहे, त्याना दवाखान्यात न्यायचे आहे असे म्हणाला. सिद्धांत व त्याच्या वडिलाने अँब्युलन्सने लेकरांना सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे नेले. तेथील डॉक्टरांनी लेकरांना जेवणातून विषाबाधा झाल्याचे सांगीतले. लेकरांच्या आजोबांनी दिंनाक १६ जून रोजी सरकारी दवाखाना विष्णुपुरी येथे जावुन नात साक्षीला तुला काय झाले असे विचारले असता तिने सांगीतले की, मला व भाऊ सुमितला मम्मीने व पप्पाने खोकल्याचे औषध पाजून चिवडा खायला दिल्याचे सांगीतले असे नंदू भालेराव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाब सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी मुलाला व सुनेला लेकरांना काय खायाला दिले असे विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. दिंनाक १७ रोजी सायंकाळी नातु सुमितवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तसेच नात साक्षीवर सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरू असून ती बेशुद्ध अवस्थेत आहे. नातवावर आज रोजी गावी अंत्यविधी करण्यात आले आहे, असे एक लेकराचे आजोबा नंदू भालेराव यांनी सांगितले.
त्यामुळे आपला मुलगा सिंद्धांथ नंदू भालेराव व सून सुलोचना उर्फ शुभांगी सिद्धांत भालेराव यांनी सगंनमत करून मुलांना विषारी औषध पाजले त्यामुळे नातु सुमित याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. सुमित यांचे मरणास कारणीभूत असल्यामुळे आपल्या मुलगा आणि सूनेवर गुन्हा दाखल करावा असा जबाब आजोबांनी दिल्यामुळे सिद्धांत भालेराव व सून सुलोचना उर्फ शुभांगी यांच्यावर हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व उपविभागीय पोलीस अधिकारी डी एस हाके यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड येथून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व तंत्रज्ञांची टीम मनुला येथे तपास करून आली.




























































