
विधान परिषदेत आज शेतकरी प्रश्नावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर आणि शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. कर्जमाफीच्या प्रश्नावर मंत्री बाबासाहेब पाटील बोलत असताना बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर बोला असे म्हटले. यावर प्रवीण दरेकर तावातावाने मधे बोलणे योग्य नसल्याचे सांगत उठले. दादागिरी चालणार नाही. यावर बच्चू कडू यांनी आम्हीदेखील इथे नवीन आलेलो नाहीत, असे दरेकरांना सुनावले.
मंत्री बोलत असताना सदस्यांनी बोलणे सभागृहाच्या प्रथा -परंपरेला धरून नसल्याचे दरेकर म्हणाले. हे वारंवार सुरू आहे. यापुढे असे घडणार नाही याची दक्षता अध्यक्षांनी घ्यावी, अशी मागणीही केली. बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आंदोलने करतात. मग मंत्री उत्तर देताना मधे बोलून त्यांना काय नुसता दिखावा करायचाय का, असा टोला लगावला. यावर मंत्री काय फक्त सभागृहाचेच आहेत का, असा सवाल कडू यांनी करीत सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची मागणी केली. यावेळी दरेकर-बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली. अखेर सभापतींनी हस्तक्षेप करीत वाद थांबवला.




























































