पालघरमधील 1853 शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ नाहीत! बदलापूर अत्याचार घटनेनंतरही सरकार ढिम्म… सरकार म्हणते निधीची कमतरता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलापूरमध्ये चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतरही अत्याचाराच्या घटना सुरू असल्याने राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महापालिका शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवणे अनिवार्य केले असताना अजूनही पालघरमधील २ हजार ११२ शाळांपैकी तब्बल १८५३ शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ‘सीसीटीव्ही’ बसवण्यास शाळांकडे निधीची कमतरता असल्याचे सरकारने लेखी उत्तरात मान्य केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही गंभीर बनून राहिला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिका शाळांमध्ये ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निधीमधून पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. तरीदेखील राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये निधीअभावी कॅमेरे बसवण्याचे काम अपूर्ण असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा प्रश्न आमदार कृपाल तुमाने यांच्यासह शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे, काँग्रेसचे भाई जगताप, सतेज पाटील, अभिजित वंजारी आदींनी विधान परिषदेत उपस्थित केला आहे. याला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिले आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाने १३ मे २०२२ आणि १६ एप्रिल २०२५ च्या निर्णयान्वये निधीबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील स्थिती

राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नोंदवल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ६४,४७७ शाळांपैकी २१,११४ शाळांनी, खासगी व्यवस्थापनाच्या ४०,५१३ शाळांपैकी ३७,७०३ शाळांनी तर इतर व्यवस्थापनाच्या ३,८४३ शाळांपैकी ३,७६५ शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात ‘सीसीटीव्ही’ बसवण्यात आल्याची माहिती सरकारकडून लेखी उत्तरात देण्यात आली आहे.