
नव्वदच्या दशकात आलेल्या दामिनी या चित्रपटाने मीनाक्षी शेषाद्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या चित्रपटात सनी देओलचा अगदी छोटासा रोल होता. परंतु आजही सनीचे डायलाॅग प्रेक्षकांच्या चिरस्मरणात आहेत. ढाई किलो का हाथ पासून ते अगदी तारीख पे तारीख हे दोन्ही डायलाॅग आजही सर्वांच्या लक्षात आहेत.
अभिनेता सनी देओलने एका मुलाखतीच्या दरम्यान 1993 मधील गाजलेल्या दामिनी चित्रपटातील वकिलाच्या भूमिकेबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या भूमिकेला मिळालेल्या प्रचंड प्रेमाची आपण कधीच अपेक्षा केली नव्हती, अशी कबुली त्यांनी दिली.
सनी देओल म्हणाले, ”जेव्हा मी ‘दामिनी’ चित्रपट केला होता. तेव्हा मला फक्त त्या चित्रपटाचा भाग व्हायचं होतं.. त्यावेळी माझ्यासाठी कोणतीही भूमिका ठरवण्यात आली नव्हती. दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि निर्माते माझे मित्र होते. त्यांनी मला एका छोट्या भूमिकेची ऑफर दिली आणि मी कोणताही विचार न करता ती स्वीकारली.”
या चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना सनी म्हणाला, “ही भूमिका इतकी लोकप्रिय होईल किंवा प्रेक्षकांच्या हृदयाला इतका स्पर्श करेल, याची मला अजिबात कल्पना नव्हती. चित्रपटातील एखादं पात्र प्रेक्षकांपर्यंत किती खोलवर पोहोचेल, हे आधी कधीच सांगता येत नाही. ‘दामिनी’मुळे आजही चाहते मला ओळखतात.. मुख्य म्हणजे तशी संधी पुन्हा कधी मिळाली नाही.”
याच मुलाखतीच्या कार्यक्रमात सनी देओलला वडील आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर ते भावुक होत म्हणाले, “मी नेहमीच माझ्या वडिलांचा मुलगा राहीन. त्यापेक्षा मोठी ओळख माझ्यासाठी दुसरी नाही.” हे बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले.
































































