
रावणामध्ये अनेक दुर्गुण होते, पण त्याने कधी दानपेट्या लुटल्या नाहीत. असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच मेहमूद गजनवीने सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं असा इतिहास आहे. पण भाजपच्या लोकांनी 66 वेळा अयोध्येत राम मंदिर लुटलं असा घाणाघातही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, नसरापूरप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे. यात सरकारचे खुप मोठे कर्तृत्व आहे असे मला वाटत नाही. नसरापूर प्रकरणात ज्या बालिकेवर हत्या झाली, त्या प्रकरणी जनतेचा रोष उसळला, त्यामुळे फास्ट ट्रॅकवर अत्यंत ऐतिहासिक वेळेत वेगवान पद्धतीने हा खटला चालला. आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली. पण जर या राज्यात कायदा सुव्यवस्थेचं राज्य असतं तर, कायद्याचा धाक असता. आणि अशा प्रकारच्या आरोपींच्या मनामध्ये सरकार, न्यायालयाची दहशत असती तर त्या मुलीचे प्राण वाचले असते. अशा प्रकारच्या घटना राज्यात सातत्याने घडत आहेत. आणि दुर्दैवाने अशा घटना घडल्यानंतर आपण आणि सरकार जागं होतं. त्यात जर सरकार सुधारणा करणार नसेल तर त्या लहान मुलींच बलिदान वाया गेलं असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रात याक्षणी कायद्याचे राज्य आहे असे वातावरणचं नाहिये. हे फक्त महिलांवरील अत्याचारसंदर्भात म्हणत नाहिये. तर राज्यातील सर्वच क्षेत्रात कायद्याची जी धुळधाण सुरू आहे, ज्या पद्धतीने पेपर फुटत आहेत. पेपर फोडणारे सर्व लोक भाजपशी संबंधित आहेत. त्यात नीट, TET, CET असो. हे सगळे दागे धोरे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचत आहेत. हा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. जो पक्ष रामद्रोह करून राम मंदिरात्या दानपेट्यांचा अपहार करतो, त्याच पक्षाचे लोक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. रावणामध्ये अनेक दुर्गुण होते, पण त्याने कधी दानपेट्या लुटल्या नाहीत. पण स्वतःला रामभक्त म्हणवणाऱ्यांनी गेल्या काही महिन्यात 66 वेळा दानपेट्या लुटल्या. मेहमूद गजनवीने सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं असा इतिहास आहे. पण भाजपच्या लोकांनी 66 वेळा अयोध्येत राम मंदिर लुटलं, याचीही नोंद इतिहासात झाली पाहिजे. भाजप रावणाचे वंशज आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
काँग्रेस नेते अजय राय यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. कारण राम मंदिरात जी देणगी चोरी झाली, त्याविरोधात ते आवाज उठवणार होते. उद्धव ठाकरेंना मी सांगितलं की राम मंदिरात आपण गेलं पाहिजे. राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्याशीही आम्ही याबाबत बोलू. राम मंदिर यांच्या बापाची जहागीर नाही, त्यासाठी आम्हीही रक्त सांडलं होतं. आमच्या लोकांनीही राम मंदिरासाठी त्याग केले आहे आणि बलिदान दिले आहे. राम मंदिर आंदोलनात आम्हीही सहभागी झालो होतो, सीबीआयचा मी एक आरोपीही आहे. मी तीन वेळा लखनौ कोर्टात हजर झालो होतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा मंदिर वही बनायेंगेचा नारा दिला होता. बाबरी मशीद पडल्यानंतर तेव्हा भाजपचे लोक पळून गेले होते. जर मशीद पाडणारे शिवसैनिक होते तर त्यांचा मला गर्व आहे हे म्हणणारे बाळासाहेब होते. अजय राय यांना का स्थानबद्ध केलं आहे, आम्हीही लवकरच तिथे पोहोचू. इथे कुठल्याही जाती धर्माचा प्रश्न नाही. राम सगळ्यांचे आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान एकही जवान शहीद झाला नसल्याचे संरक्षण मंत्र्यांनी संसदेत सांगितले होते. आता अचानक शहीद जवानांची नावं समोर आली आहेत. तर ही लपाछपी का सुरू आहे? याचा अर्थ अजून जवान शहीद झाले आहेत, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.






























































