
कायदा हा भाजप नेत्यांसाठी नाहिये, भाजपला विरोध करणाऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळण्यासाठीच कायदा आहे, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात तरी राहतील का असे वातावरण मिंध्यांनी निर्माण केले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, कायदा हा भाजप नेत्यांसाठी नाहिये. कायदा हा फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी आहे. सत्ताधारी लोकांनी कितीही बलात्कार करावेत, कितीली लूटमार करावेत, कितीही देश लुटावा, संसदेच्या आणि विधीमंडळाच्या कायद्याचे उल्लंघन करून पक्षांतर करावीत. पण कायदा त्यांच्यासाठी नाहिये. भाजपला विरोध करणाऱ्यांच्या गळ्याभोवती फास आवळण्यासाठीच कायदा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
ओम निंबाळकरांचा उल्लेख मी सोंगाड्या असा केला. मला देवेंद्र फडणवीस यांचं आश्चर्य वाटतं, विरोधी पक्षात असताना त्या खासदारांना तुम्ही भेटी देत नाहीत. त्यांनी आणलेल्या विकासकामांवर तुम्ही चर्चा करत नाहीत. पण एखाद्याने पक्षांतर केलं, की तुम्ही त्याला समोर बसवता, त्याचे कागद मंजूर करता. फडणवीसांनी केलेला हा घटनेशी द्रोह आहे. म्हणूनच या कर्माची फळं त्यांना मिळत आहेत. देशात ऑपरेशन देवेंद्र सुरू झाले आहे. काही काळापासून फडणवीस दिल्लीत उच्चपदावर जाणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात तरी राहतील का असे वातावरण मिंध्यांनी निर्माण केले आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
ज्या खासदारांनी गद्दारी केली आहे, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजे. कायद्याने ते अपात्र ठरले पाहिजे. घटनेच्या कलम 10 नुसार पक्षांतर विरोधी कायद्यानुसार त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे. अशा पक्षांतर केलेल्या गुन्हेगारांना देवेंद्र फडणवीस आपल्या चेंबरमध्ये बसवून त्यांना चहा बिस्किटं देऊन, त्यांच्या कागदावर सह्या करत असतील तर स्वतः फडणवीस हे रामद्रोही आणि घटनाद्रोही आहे. याची किंमत या सगळ्यांना चुकवावी लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.






























































