Haryana News – खेळता-खेळता चार वर्षांचा मुलगा 220 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला, बचावकार्य सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणामध्ये अंबाला जिल्ह्यातील धन्योडा गावात चार वर्षांचा मुलगा खेळता खेळता 220 फूट खोल बोअरवेलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेलं असून तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळावर पोलीस प्रशासन दाखल झालं आहे. तसेच लष्कराने मुलाला जीवदान देण्याची जबाबदारी स्वीकारली असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागांमध्ये सध्या शेतीची कामं सुरू आहेत. त्यामुळे चार वर्षांचा निर्भय आपल्या काकांसोबत शेतात गेला होता. शेतात भाताची लागवड सुरू असल्यामुळे काकांसह सर्व लोकं भात लागवड करण्यामध्ये व्यस्थ होते. भात लागवड सुरू असताना निर्भय शेतातच खेळत होता. याच दरम्यान, काकांचा डोळा चुकवून खेळता खेळता निर्भय शेतात असलेल्या 220 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. बोअरवेलमध्ये निर्भय पडताच सर्वजण हादरले. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनेचं गांभीर्य लक्षात घेता NDRF ला पाचारण केलं. NDRF चे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून सध्या बचावकार्य सुरू आहे.