
गद्दार खासदारांचं करायचं काय…? गद्दार… गद्दार… अशा घोषणा देत नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यात संतप्त शिवसैनिकांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार निषेध केला. फुटलेल्या सहा गद्दार खासदारांच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आंदोलन केल्याने काही काळ परिसरातील वातावरण तापले होते.
खासदार श्रीकांत शिंदे नांदेड विमानतळावरून माहूर मार्गे सारखणी येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना शिवसेनेचे पदाधिकारी व हजारो शिवसैनिक रस्त्यावर जमले. गद्दारांचा निषेध असो… अशा घोषणांसह पक्षाच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितू चोले, शहर प्रमुख बालाजी वाघमारे, गजानन चव्हाण, अक्षय वाघ, आकाश सातव, मंगेश सुकळकर, संदीप गोरडे, वसीम शेख, सुलतान शेख, रघु दवणे, बाळू दवणे अक्षय मार्गमवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे पोलिसांच्या ताब्यात
श्रीकांत शिंदे यांच्या सारखणी दौर्यापूर्वी राजकीय वातावरण तापले. माहूर-किनवट रस्त्यावर अंजनखेड फाट्यावर शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवल्याची दखवले. यामुळे पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांना अंजनखेड येथील त्यांच्या निवासस्थानावरून प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. त्यानंतर खराटे यांना सिंदखेड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
खराटे यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक होवून सिंदखेड पोलीस ठाण्यासमोर आणि अंजनखेड फाट्यावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले. आणि यावेळी त्यांनी नीम का पत्ता कडवा है, नागेश पाटील भडवा है, ५० खोके एकदम ओके…. अशा जोरदार घोषणा देत निषेध नोंदवला. शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांचे कौतुक
दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्याशी संवाद साधला. तुमच्या सर्वांच्या मी पाठिशी आहे, काळजी करू नका, तुम्ही चांगले काम करत आहात, गद्दाराच्या विरोधातील ही लढाई अशीच पुढे चालू द्या, असे सांगून शिवसैनिकांचे कौतुक केले.




























































