
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा प्रति पंढरपूर अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थांन ला शॉर्ट सर्किटने आग लागली. दरम्यान माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दूरदृष्टीकोन ठेवून बोरी नदी काठाला रस्ते केल्याने अग्निशमन बंम्ब पोहचू शकले. अन्यथा सराफ बाजरातील निमुळत्या रस्त्यातून अग्निशमन बंम्ब पोहचणे शक्य नव्हते. अनेकांनी साहेबराव पाटील यांचे कौतुक केले.
सकाळी हभप प्रसाद महाराज अमळनेरची संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूर कडे रवाना झाले. आणि रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही यंत्रणेला शॉर्ट सर्किटने वाडी संस्थानातील विठ्ठल रुख्मिनी मंदिराच्या वरच्या बाजूला प्रसाद महाराजांच्या बैठक खोलीला आग लागली. मंदिर संपूर्ण लाकडी आणि दरवर्षी ऑइल पेंट लावत असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. तातडीने अग्निशमन दल , अमळनेर पारोळा येथील बंम्ब , खाजगी वाहने , नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
आधी पांडुरंग ! प्रसाद महाराज माघारी नाहीच !
शेकडो वर्षापूर्वीचे मंदिर असून आगीत जळाले मात्र प्रसाद महाराजांची दिंडी थांबली नाही. आधी पांडुरंग महत्वाचा म्हणत महाराज माघारी फिरलेच नाहीत. स्वतःची आईचे निधन झाले होते तरी प्रसाद महाराज माघारी फिरले नव्हते पांडुरंगाच्या भक्तीपूढे सारे दुःख आणि विश्व छोटे आहे. संतांना दुःख ,आनन्द ,मोह माया काहीच नसते.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अग्निशमन दलास घटनास्थळी पाठवले.ते स्वतःही दाखल झाले अग्निशमन शमन कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्यास सुरवात केली.याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने आग विझविण्यासाठी अडथळे निर्माण होत होते.आमदार अनिल पाटील यांनी चोपडा,शिरपूर,पारोळा येथील गाड्या पाठविण्याची विनंती केली.पारोळा पालिकेची गाडी तातडीने दाखल झाली.अमळनेर शहर पत्रकार संघाने सोशल मीडियावर खाजगी टँकर धारकांना आवाहन केले.आमदार अनिल पाटील यांनी आर बी कास्ट्रक्शन चे टँकर पाठविले.
पालिकेच्या वतीने नगरसेवक अनिल महाजन,पंकज चौधरी,बाळा संदनशिव,पंकज भोई,गोपी कासार,सूरज परदेशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत,जितेंद्र ठाकुर, नितीन निळे,विजय पाटील,संजय कौतीक पाटील , महेंद्र पाटील , शोएब शेख, अरशद खान, हुजैफा पठान, इमरान पठान, नईम पठान, नसीब पठान,राजा पठान फरहान शेख, आकिब पठान, रिजवान खान यासह अनेकांनी मदतकार्य केले. इथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम स्वतः घटनास्थळी येऊन नियंत्रण करीत होते.डीवायएसपी विनायक कोते यांनी पोलीस ताफ्यासह येऊन गर्दी आटोक्यात आणली त्यामुळे अग्निशमन दलास सोईचे झाले.
बरेच जळाले पण देव शाबूत राहिले
सर्व काही जळाले होते मात्र वाडी संस्थानातील देव मात्र शाबूत राहिले. याबद्दलही आश्चर्य आणि आनंद व्यक्त केले जात आहे.
काही दिवस मंदिर बंद
दरम्यान मंदिराचे नुकसान झाले असल्याने स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही तोपर्यंत काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद असेल अशी माहिती प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी चर्चेअंती दिली.





























































