
चेंबूर येथे झाड अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तव याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या एकुलत्या एक मुलाचे अंत्यसस्कार करताना त्याच्या आई वडिलांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थित सर्वच हळहळले. विहानसोबत त्याच्या आवडत्या बॉलला देखील निरोप देण्यात आला.
चेंबूर येथे झाड अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप विहानचा मृत्यू झाला. आपल्या एकुलत्या एक चिमुरड्याच्या अचानक जाण्याने श्रीवास्तव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विहानच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसरात केवळ शोक आणि आक्रोश पाहायला मिळत होता. या प्रकरणी कुटुंबीयांनी या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे.
“विहान अत्यंत हुशार होत. क्रिकेट त्याचा जीव होता, म्हणूनच आम्ही अंत्यसंस्कार करताना त्याचा लाडका क्रिकेट बॉलही त्याच्यासोबतच दिला…” विहान श्रीवास्तवच्या एका नातेवाईकाने सांगितले. .
हा अपघात नाही, तर प्रशासनाचा हलगर्जीपणा!
विहानचे आजोबा एस. एन. श्रीवास्तव यांनी ‘एनडीटीव्ही’शी बोलताना या दुर्घटनेला थेट प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “हा निव्वळ निष्काळजीपणा आहे. ते झाड आधीपासूनच अत्यंत धोकादायक अवस्थेत होते आणि ते तिथून हटवणे गरजेचे होते. येथील रहिवाशांनी यापूर्वीही प्रशासनाकडे याबाबत चिंता व्यक्त केली होती. मग वेळीच कारवाई का केली गेली नाही?”
अतिशय जड अंतःकरणाने आजोबा पुढे म्हणाले, “माझा नातू आता कधीच परत येणार नाही, पण न्याय मिळालाच पाहिजे. ज्यांच्या बेजबाबदारपणामुळे हे घडले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अशा हलगर्जीपणामुळे इतर कोणत्याही निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागू नये.” याप्रकरणी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्याचा विचार कुटुंबीय करत असून, दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.




























































