युरोपियन T20 प्रीमियर लीगमध्ये आर.अश्विनची कर्णधारपदी वर्णी, राहुल द्रविडही दिसणार वेगळ्या भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा स्टार माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हिंदुस्थान आणि अमेरिकेनंतर आता युरोपमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे युरोपियन T20 प्रीमियर लीगमध्ये हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि टी20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड एका संघाचे मालक आहेत. या युरोपियन लीगचा हा पहिला हंगाम 26 ऑगस्टपासून सुरू होणार असून एकून 6 संघ विजेतेपदासाठी एकमेकांना कडवी झुंद देताना पाहायला मिळतील.

युरोपियन T20 प्रीमियर लीगच्या (ETPL) पहिल्याच हंगामात आर. अश्विन ‘डबलिन गार्डियन्स’ संघाकडून खेळणार असून, या संघाच्या कर्णधार आणि मार्गदर्शकाची दुहेरी भूमिका तो पार पाडेल. आयपीएल 2025 नंतर निवृत्ती घेतलेला 39 वर्षीय अश्विन सध्या अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये (MLC) खेळत आहे. तसेच राहुल द्रविड या 6 संघांच्या लीगमध्ये ‘डबलिन’ फ्रेंचायझीचे मालक आहेत. द्रविड यांच्या संघात अश्विन सामील झाल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

क्रिकेट आयर्लंड, क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त भागीदारीतून ही लीग सुरू होत आहे. युरोपमधील ही पहिली आयसीसी (ICC) मान्यताप्राप्त अनेक देशांचा सहभाग असलेली फ्रेंचायझी टी-20 लीग आहे. या पहिल्या हंगामात डबलिन, बेलफास्ट, एडिनबर्ग, ग्लासगो, रॉटरडैम आणि एम्स्टर्डम अशा एकूण 6 शहरांचे संघ विजेतेपदासाठी लढतील. ही स्पर्धा 26 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्ये खेळवली जाणार आहे.

या लीगमध्ये जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मैदानात उतरणार आहेत. रॉटरडैम डॉकर्स संघाकडून दक्षिण आफ्रिकेचे फाफ डुप्लेसिस (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डोनोवन फरेरा, एनरिक नॉर्खिया आणि मिचेल ओवेन खेळताना दिसतील. ग्लासगो कॉस्मिक संघाकडून लुंगी एनगिडी, डुआन जानसन, केशव महाराज आणि न्यूझीलंडचा सलामीवीर फिन एलन मैदानात उतरतील, तर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन या संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. एडिनबर्ग कॅसल रॉकर्सचे नेतृत्व मिचेल सँटनर करणार असून, त्याच्यासोबत ट्रेंट बोल्ट खेळेल आणि जेम्स फॉस्टर या संघाची जबाबदारी सांभाळेल. एम्स्टर्डम फ्लेम्स संघाकडून मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मायकेल ब्रेसवेल यांच्यासह स्थानिक खेळाडू म्हणून नेदरलँड्सचे स्कॉट एडवर्ड्स आणि बास डी लीड खेळतील.