
निसर्गाची अवकृपा, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, वाढता उत्पादन खर्च आणि बँकांसह खाजगी कर्जाचा डोंगर अशा चौफेर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बळीराजाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. निलंगा तालुक्यातील सोनखेड आणि जामगा येथे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये शेतीवरील कर्ज आणि कथित खाजगी सावकारीचा असह्य त्रास कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी केला आहे.
सोनखेड येथे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपवले. सोनखेड येथील मारुती मनोहर सोळुंके (वय ३६) या तरुण शेतकऱ्याने २५ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २७ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. शेतीवरील कर्जाचा वाढता बोजा आणि कथित खाजगी सावकारीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक ताणातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
जामगा येथील शेतकऱ्याची शेतातच जीवनयात्रा संपली दुसरी हृदयद्रावक घटना जामगा येथे घडली. पंडित रामा पवार (वय ४८) यांनी ३० जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. शेतीवरील कर्जाचे ओझे असह्य झाल्यानेच त्यांनी आपले जीवन संपवल्याचा दावा त्यांच्या पत्नीने आणि गावकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; ठोस कारवाईची मागणी
अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या दोन लागोपाठच्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “शेती करायची कशी आणि जगायचं कसं?” असा संतप्त व उद्विग्न प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत. शासनाने पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी आणि बेकायदेशीर खाजगी सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
पोलीस तपास सुरू
दरम्यान, या दोन्ही दुर्दैवी घटनांची पोलीस दप्तरी नोंद झाली असून तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमकी कारणे पोलीस तपासातूनच अधिकृतपणे स्पष्ट होतील. मात्र, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याने, प्रशासनाने व संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पीडितांना न्याय द्यावा, अशी तीव्र भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.





























































