
दापोली तालुक्यातील मुरुड-कर्दे परिसरात सलग २८ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी उशिरा कर्दे गावात पूर्ववत झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.
वीजपुरवठा खंडित झाल्याने घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक, पर्यटक आणि नागरिकांचे मोठे हाल झाले. सोमवारी दुपारी मुरुड गावातील वीजपुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला; मात्र कर्दे गाव अंधारातच होते. अखेर तब्बल २८ तासांनंतर कर्दे गावात वीजपुरवठा पूर्ववत झाला. मुरुड ते कर्दे हे अवघे तीन ते चार किलोमीटरचे अंतर असतानाही तांत्रिक बिघाड शोधून तो दूर करण्यासाठी एवढा विलंब का झाला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दुरुस्तीच्या कामातील संथगतीमुळे महावितरणच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्याच्या डिजिटल युगात वीजेवर दैनंदिन व्यवहार, व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटन मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारे दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणने सक्षम यंत्रणा उभी करून बिघाड तातडीने शोधून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.































































