मोदी नावाचा ‘पत्ता’ निसटला की भाजपचा पत्त्याचा बंगला कोसळेल! राज ठाकरे यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सध्या जे राजकारण सुरू आहे, ते चांगलं नाही. खूप घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे. याचा फटका भविष्यात भाजपलाही बसणार आहे. आपण पत्त्याचा बंगला करायचो ना तसं. येथे उलट आहे. सर्वात खालचा पत्ता मोदींचा आहे. एकदा का मोदी नावाचा पत्ता निसटला की भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळणार, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर आज कडाडून हल्ला चढवला.

ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले,  ‘महाराष्ट्रात आणि देशात सध्या सुरू असलेले पक्षपह्डीचे राजकारण अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारा आहे.’

सत्ताधाऱ्यांनी जेव्हा-जेव्हा विरोधक संपवले, तेव्हा-तेव्हा सत्ताधारी पक्षात विरोधक तयार झाले आणि त्यांनीच त्यांना संपवलं. हा जगाचा इतिहास आहे. हीच प्रक्रिया आता भाजपात सुरू झाली असून आणीबाणीच्या काळातदेखील हेच घडले होते, असे राज ठाकरे म्हणाले.

सध्या प्रश्न ‘खरेदी कोण करतंय’ हा नाही, तर ‘विकले जाण्यास कोण तयार आहे’ हा आहे. आता देहविक्रीला हे तयार असतील तर गिऱहाईक आहेतच. लोकांमध्ये या सर्व गोष्टींचा संताप आहे.

उद्या फोडाफोडीचा त्रास भाजपलाही होईल

राजकारणात सत्ता येत असते आणि जात असते, पण शेवटी आपला महाराष्ट्र आणि देश आपण कुठे नेणार आहोत? आपण राजकारण कुठे नेणार आहोत? सध्या महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, ते खूप भयानक आणि गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे काही चांगलं राजकारण नव्हे. उद्या सत्ता गेल्यानंतर भाजपलाही अशाच प्रकारचा त्रास होईल. तेव्हा भाजप काय करेल? आपण काय करतोय, कुठपर्यंत जायचंय? याला काही मर्यादा आहेत की नाही,’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

हे अमित शहांचे राजकारण

शिवसेनेचे जे सहा खासदार फुटले ते भाजपमध्ये का गेले नाहीत? तृणमूल कॉँग्रेसचे 22 खासदार फुटले त्यांनी स्वतंत्र गट का तयार केला? सध्या महाराष्ट्रात आणि देशात जे काही फोडाफोडीचे प्रकार आणि घाणेरडे राजकारण पाहायला मिळत आहे, ते सर्व अमित शहा यांचे राजकारण आहे. उद्या जर त्यांना पंतप्रधान पदावर दावा सांगायचा असेल तर पक्षातील खासदारांनी विरोध केल्यास बाहेरून लोक मदत करतील किंवा पाठिंबा देतील हा डाव त्यामागे असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेला नाही. कोणतीही सत्ता कायमस्वरूपी नसते. त्यामुळे सत्तेच्या जोरावर विरोधकांना कमकुवत करण्याचे प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहेत. आज जे घडत आहे, त्याचाच परिणाम भविष्यात सत्ताधाऱ्यांनाही भोगावा लागू शकतो. – राज ठाकरे