धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर येथे काल स्कूल बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि चार विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाद्वारे केली. या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणण्याचीही त्यांनी मागणी केली.

आमदार सुनील शिंदे म्हणाले, पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असून यापूर्वी तत्कालीन नगरविकासमंत्र्यांनी अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. पालिकेचे कर्मचारी परवानगी मिळत नाही असे कारण पुढे करत सोसायटय़ांमध्ये जाऊन धोकादायक झाडांची छाटणी करत नाहीत. त्यामुळे असे अपघात घडतात, असा आरोप त्यांनी केला. गेल्या वर्षी वरळीत बाईकवरून जाणाऱ्या जगताप नावाच्या व्यक्तीच्या अंगावर झाड कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. अद्यापही त्याच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळाली नाही. अशा अपघातात नुकसानभरपाई देण्याचे निकष ठरवले पाहिजे, अशी मागणीदेखील सुनील शिंदे यांनी केली.