पावसाची झोडपणी, ठाणे, पालघर, रायगडात दाणादाण; वसईत दोन कार वाहून गेल्या, पाण्यातून शॉर्टसर्किट, नवी मुंबईत दोन तरुणींना झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एल निनोच्या प्रभावामुळे उशिरा ढेरेदाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने आज ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत जोरदार बॅटिंग केली. विविध भागांत दिवसभरात सुमारे १०० ते १५० मिलीमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वसईत नाल्याला आलेल्या महापुरात दोन कार वाहून गेल्या, तर नवी मुंबईत रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यातून शॉर्टसर्किट झाल्याने स्कूटरवरून जात असलेल्या दोन तरुणींना विजेचा जोरदार धक्का बसला. मुंब्रा पसिरातील एका इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळला, मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. धुंवाधार पावसामुळे ठाणे शहरात ५८ तर कल्याण-डोंबिवली शहरात १८ झाडे पाडली. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण आणि भाईंदर शहरातील सखल भागांत आणि रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

उल्हासनगर कॅम्प ५ मध्ये अनेक भागांत पाणी तुंबले. अशाच एका चाळीतून आजीला पाण्यातून वाट काढत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर मागील चार दिवसांपासून कायम आहे. यामुळे प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली. कुंभलवणे फाटा येथे मातीचा ओसरा रस्त्यावर आल्याने, काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे या मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या.

दोन तरुणींना विजेचा झटका
नवी मुंबई शहरात आज जोरदार पाऊस पडला. नेरुळ येथील एलपी जंक्शन येथे फ्लॉट झालेल्या केबलमुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून शॉर्टसर्कीट होऊन दोन तरुणींना विजेचा जोरदार धक्का बसला. या दोन्ही तरुणी स्कुटरवरून जात होत्या. मात्र विजेचा धक्का बसल्यामुळे त्या जाग्यावर कोसळून बेशुध्द पडल्या.

विक्रमगडमधील लाकडी पूल वाहून गेला, भोपोली, घाणेघर गावांचा संपर्क तुटला
विक्रमगड तालुक्यातील भोपोली आणि घाणेघर गावांना जोडणारा लाकडी पूल पहिल्याच पावससात वाहून गेल्यामुळे या गावांमधील २ हजार ३५० आदिवासी नागरिकांचा संपर्क तुटला आहे. गावांतील दीडशे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. दरवर्षी पावसात हा लाकडी पूल वाहून जात असला तरी प्रशासनाच्या माध्यमातून कायम स्वरूपी पूल तयार केला जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

लाकडी पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचा शाळेचा रस्ता बंद झाला आहे. या भागातील ग्रामस्थांना पालघर किंवा विक्रमगड येथे जाण्यासाठी बोरांडा मार्गे ६ ते ७ किलोमीटर किंवा चाबके तलावली मार्गे ५ ते ६ किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. घाणेघर ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र शंकर पाटील यांनी कायमस्वरूपी पुलासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. तरीही पुलाचे काम मार्गी लागलेले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

..तर शिवसेना आंदोलन छेडणार

आदिवासींना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागणे ही लजिरवाणी बाब आहे. दरवर्षी पूल वाहून जातो, प्रस्ताव दिले जातात, आश्वासने मिळतात; मात्र प्रत्यक्षात काम होत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे होऊन कायमस्वरूपी पुलाचे काम तातडीने मंजूर करून सुरू करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पालघर जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी दिला आहे.

वसईतील राजावळी, वाघराळ पाडा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला महापूर आला. या महापुरात दोन कार वाहून गेल्या.

ठाण्यात ५८, कल्याण-डोंबिवलीत १८ झाडे कोसळली
धुवाधार पावसामुळे आज ठाण्यात तब्बल ५८ झाडे कोसळली तर कल्याण आणि डोंबिवली शहरात १८ झाडे उन्मळली. त्यामुळे अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. डोंबिवली एमआयडीसीमधील सुदर्शन नगरमध्ये असलेल्या साईसृष्टी सोसायटीसमोरील मोठे झाड उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर कोसळले. परिणामी, या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने सुदर्शननगरमध्ये जाऊन झाड हटवण्याचे काम सुरू केले. मलंग रोडवरील चेतना शाळेजवळ तुटलेल्या चेंबरमध्ये एक कंटेनर अडकल्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली.

विरारमध्ये पूरस्थिती
धुवाधार पावसामुळे विरारच्या अनेक भागांत पाणी साचले. शहरातील अनेक ठिकाणचे मुख्य रस्ते आणि सखल भाग पूर्णपणे जलमय झाले. विरार विवा कॉलेज परिसर, यशवंत नगर, बोळींज, विरार स्टेशन परिसर, फूलपाड़ा, मनवेल पाड़ा, नालासोपारा स्टेशन परिसर, सेंट्रल पार्क, वाकणपाड़ा, संतोष भवन, धानीवबाग, नालासोपारा पश्चिम, वसई सातीवली, पेल्हार, गिरीज, देवतलाव, कुंभारपाडा रस्त्यावर मोठ्या पाणी सचल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली. शहरात आतापर्यंत सुमारे ६५० मिमी पाऊस झाला आहे.

पनवेलध्ये स्लॅब कोसळून तरुणाचा मृत्यू
कामोठे सेक्टर-१० येथील साई सिद्धी सोसायटीमध्ये आज पहाटे घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून सुरेश लोखंडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत वेदिका लोखंडे (१२) ही जखमी झाली असून तिच्यावर कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साई सिद्धी सोसायटीतील फ्लॅट क्रमांक १०१मध्ये लोखंडे कुटुंब वास्तव्यास आहे. आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी वेदिका बेडरूममध्ये झोपलेले असताना अचानक बेडरूमचा स्लॅब कोसळला.