
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. दगडाच्या खाणीमध्ये काम सुरू असताना अचानक भलामोठा खडक कोसळल्याने 7 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बंगळुरू दक्षिण तालुक्यातील माडपट्टणा येथील एका क्रशर युनिटमध्ये ही दुर्घटना घडली.
बंगळुरू दक्षिणमधील कावेरी जेली क्रशर या खाणीत नित्यनेमाप्रमाणे मजूर सकाळीच कामावर हजर झाले होते. कामगार खाणीत उतरून अवजड यंत्रसामग्री हाताळत असतानाच अचानक वरचा एक मोठा खडक खाली कोसळला. हा खडक इतका अवाढव्य होता की मजुरांना तिथून पळ काढण्याची किंवा स्वतःचा जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. सात मजूर या खडकाखाली चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत मजूर बिहार राज्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या भीषण दुर्घटनेमध्ये 6 मजूर गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेच्या वेळी खाणीत 15 ते 20 मजूर काम करत होते. बहुतांश मजूर हे बिहार आणि कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे सर्वजण रोजंदारीवर काम करायचे आणि खाणीजवळच तात्पुरत्या शेडमध्ये राहत होते.
VIDEO | Karnataka: Seven workers from Bihar were killed after a massive rock collapsed at a stone quarry in Bengaluru on Thursday, police said. According to police, the tragedy occurred in the early morning at Madapattana in Bengaluru South Taluk. Visuals from the incident site.… pic.twitter.com/ft28kUtaP6
— Press Trust of India (@PTI_News) July 2, 2026
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच तावरेकेरे पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवली जात आहे. ही दगड खाण आनंदस्वामी नावाच्या व्यक्तीची असून पोलिसांनी त्याला तात्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खडक नेमका कशामुळे कोसळला, याचा तपास पोलीस करत असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



























































