राम मंदिर चोरी प्रकरणातील आरोपींच्या घरावर चालणार बुलडोझर! चंपत राय यांच्यावर एफआयआरसाठी वकिलांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या कथित देणगी चोरी प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाने अशा घरांची ओळख पटवली आहे, ज्यांचा नकाशा मंजूर नाही किंवा ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे अशा घरांवर कारवाई करण्यात येणार आहे. तर चंपत राय यांच्यावर एफआयआर दाखल करण्यासाठी वकिलांनी आंदोलन केले आहे.

राम मंदिर घोटाळ्यातील आरोपींची घरे रडारवर आहेत. ज्या आरोपींनी मंदिरात नोकरी मिळवल्यानंतर घरे बांधली आहेत. त्यामुळे या घोटाळ्यातील आरोपी लवकुश मिश्राचे शहादतगंजमध्ये बांधकाम सुरू असलेले घर आणि अनुकल्प मिश्राच्या काwशल पुरी येथील घरावर बुलडोझर फिरवला जाऊ शकतो. अनिल मिश्रा यांनी ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर विशेष तपास पथकाने डॉ. अनिल मिश्रा यांची बंद दाराआड चौकशी केली तर गोपाल राव यांना बाहेर बसवले. मोठे लोक स्वतःचे संरक्षण करण्यासाठी छोटय़ा लोकांना यात गोवत आहेत, असे टिन्नूचा भाऊ दिनेश यादव म्हणाला आहे. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी त्याला यात गोवले आहे, असेही त्याने सांगितले. दरम्यान, चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राव यांच्याविरुद्ध आम्ही सर्वात आधी तक्रार दाखल केली. तक्रारीनंतरही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले आहे, असे अयोध्या बार असोसिएशनचे अध्यक्ष कालिका प्रसाद मिश्रा म्हणाले.