
पावसाळापूर्व कामे केल्याचा दावा करणारे सत्ताधारी आणि पालिकेची अक्षरशः पोलखोल झाली आहे. कुठे झाडे कोसळताहेत, कुठे मॅनहोलमध्ये माणसे पडताहेत तर ठिकठिकाणी पाणी तुंबतंय तर कुठे कचरा साचतोय. स्कूल व्हॅनवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असताना आज मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला महापौर आणि पळपुटे नगरविकास खात्याचे मंत्री फेकनाथ मिंधेच जबाबदार आहेत, असा आरोप शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी साकीनाका येथे मॅनहोलमध्ये व्यक्ती पडण्याची घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. पालिकेत सत्ता असलेल्या भाजप-मिंधेंच्या काळात पावसाळापूर्व कामे झाली नसल्याचे आम्ही सातत्याने सांगत आहोत. ते दुर्दैवाने आता खरे ठरत आहे. शहरात नालेसफाई झालेली नाही. त्याबाबतचे अनेक पह्टो येत आहेत. अंधेरी सब वे पहिल्या पावसात तुंबला, आता तुंबला आणि यापुढेही तुंबणार आहे. हिंदमाता परिसर आम्ही पूरमुक्त केला होता. तोदेखील यांनी तुंबवून दाखवला आहे. मुंबई महापालिकेत भाजप-मिंधेंची सत्ता आल्यापासून सर्व व्यवस्थेच्या चिंधडय़ा उडाल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
कंत्राटदार खूश, मुंबईकरांचे हाल
भाजप-मिंध्यांनी मुंबईची अवस्था बिकट केली आहे. त्यांचे सर्व कंत्राटदार खूश आहेत, मात्र मुंबईकरांचे हाल होत आहेत. या दुर्घटनेला महापौर जेवढय़ा जबाबदार आहेत, तेवढेच नगरविकास खात्याचे मंत्री फेकनाथ मिंधेदेखील जबाबदार आहेत. ते आमदार, खासदार फोडण्यात, विकत घेण्यात गुंतले असतील. मात्र त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. कंत्राटदाराकडून पैसे कसे घ्यायचे, मिळालेल्या पैशातून आमदार, खासदार विकत घ्यायचे, या त्यांच्या ऑपरेशन देवेंद्रमध्ये ते बिझी असल्याने ते मुंबईकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यासाठी ते कंत्राटदार, अयोध्या, उज्जैन येथील मंदिरातून पैसा काढत आहेत, असेही ते म्हणाले.
असे महापौर पाहिले नाहीत!
दोन दिवसांत मॅनहोलमध्ये पडण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी महापालिकेचे अधिकारी महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडले, तेव्हा त्यांच्यावरच चौकशी लावली. विचारपूस करण्याऐवजी चौकशी लावणाऱ्या या पहिल्याच महापौर आहेत. असे महापौर आपण याआधी पाहिले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. या महापौरांना मुंबईकरांची नाही, तर बांगलादेशींची काळजी आहे, हे आपले दुर्दैव आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.



























































