नवजात बाळ विक्री प्रकरण – भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवजात बाळ विक्री आणि मानवी तस्करी केल्याप्रकरणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या दोन कट्टर समर्थक भाजपच्या पदाधिकारी महिलांना पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर या दोघींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई तसेच नवजात बाळ खरेदी केल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांना अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींविरुद्ध मानवी तस्करी आणि लैंगिक गुह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे या दोघींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

या कारवाईनंतर या प्रकरणामध्ये आणखी कोण-कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिला भाजपच्या पदाधिकारी असून या प्रकरणात या दोन्ही महिलांची भूमिका नेमकी काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. या महिला यंग चांदा या संघटनेच्या सक्रिय पदाधिकारीसुद्धा राहिलेल्या आहेत. या दोन्ही महिलांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच भाजपचे मंत्री, नेते यांच्यासोबत छायाचित्र आहे.