
मोठा गाजावाजा करून 1 मे रोजी सुरू करण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक मार्गावर खड्डे पडले आहेत. मिसिंग लिंकवरील खड्ड्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी राज्य सरकारच्या कारभाराची पोलखोल करत आहेत. पहिल्याच पावसात खड्डे पडल्यामुळे मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता मिसिंग लिंकवर दोनच खड्डे पडले असून, पूर्ण रस्त्यावर खड्डे नाहीत, असे ते म्हणाले. कोणतेही काम झाल्यानंतर पहिल्या पावसानंतर त्यावर दुसरी लेअर येते. त्या पावसामध्ये रस्त्याची टिकण्याची क्षमता टेस्ट करण्यात येते. या इंजिनीअरिंगच्या गोष्टी आहेत. कामात कमतरता लक्षात आणून दिली ते चांगलेच आहे. कुठे काही कमतरता असतील तर त्या दूर करता येतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देशातला उंच पूल, उंच बोगदे, डॅमच्या खाली बोगदा पहिल्यांदा करून दाखवला आहे. टीका करणाऱयांनी फक्त टीका करू नये, असेही त्यांनी सांगितले.
































































