
आणखी तीन दिवस धोक्याचे आहेत, सतर्प रहा, अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन नागरिकांना करतानाच, या दिवसांत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी न देणाऱ्या खासगी कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. तसे परिपत्रकच जारी करण्यात आले.
मुसळधार पाऊस आणि ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आज दुपारनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयातील राज्य आपात्कालीन नियंत्रण कक्षात जाऊन बदलत्या हवामानाचा आणि त्यादृष्टीने प्रशासनाच्या तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
पाऊस परिस्थितीचा आढावा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन मुंबईसह सर्व राज्यातील पाऊस परिस्थितीबाबत माहिती घेतली. या वेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. दुर्घटनाप्रसंगी तातडीची मदत वेळेवर पोहोचावी, पूरपरिस्थिती उद्भवल्यास ती गंभीर होण्यापूर्वीच संबंधित भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे, वीज आणि पाणीपुरवठय़ाची विशेष काळजी घेण्यात यावी, यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश…
- आपात्कालीन मदतीची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी चोवीस तास फिल्डवर रहावे
- राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांनी ‘अलर्ट मोड’वर रहावे.
- पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके तिथे तातडीने रवाना करण्यात यावीत.
- पूरस्थितीत संबंधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सुरक्षित निवाऱ्यांची तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी.
- दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास वैद्यकीय उपचार वेळीच मिळावेत यासाठी डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांना तयार ठेवावे.
- मुसळधार पावसातही कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती करणाऱ्या आस्थापनांवर पोलीस व कामगार विभागाने कारवाई करावी.
- दरडी कोसळल्यास तो ढिगारा युद्धपातळीवर हटवून वाहतुकीला बाधा येणार नाही याला प्राधान्य द्यावे.
देहू-आळंदीत जाऊ नका, वारकऱ्यांना आवाहन
इंद्रायणीवरचे चारही पूल पाण्याखाली चालले आहेत. 10 तारखेला पुण्यात वारी येते. पण या स्थितीमुळे वारकऱ्यांनी देहू-आळंदीला जमा न होता पुण्यात यावे. वारीकरिता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या केल्या आहेत. जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.






























































