मायक्रोसॉफ्टची कर्मचारी कपात; 4 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना केले कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीने जगभरातील सुमारे 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना, म्हणजेच एकूण मनुष्यबळाच्या सुमारे 2.1 टक्के कर्मचाऱ्यांना, कामावरून कमी केले आहे. या कपातीचा सर्वाधिक फटका कंपनीच्या व्यावसायिक विक्री आणि एक्सबॉक्स गेमिंग विभागाला बसला आहे.

कंपनीच्या मुख्य मनुष्यबळ अधिकारी एमी कोलमन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत संदेशात सांगितले की, ही कर्मचारी कपात केवळ खर्च कमी करण्यासाठी नसून, बदलत्या तंत्रज्ञान उद्योगाशी जुळवून घेण्यासाठी कंपनीच्या पुनर्रचनेचा भाग आहे.

मायक्रोसॉफ्टमध्ये आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कर्मचारी कपात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही कंपनीने दोन टप्प्यांत सुमारे 15 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती. सध्या कंपनीकडे जगभरात 2.2 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या फेरीत सर्वाधिक फटका एक्सबॉक्स गेमिंग विभागाला बसला आहे. जवळपास 1 हजार 600 कर्मचाऱ्यांची कपात या विभागात करण्यात आली असून, पुढील काळात आणखी 3 हजार 200 पदे कमी करण्याची तयारी सुरू असल्याचे कंपनीने संकेत दिले आहेत. या पुनर्रचनेमुळे एक्सबॉक्सच्या एकूण कर्मचारी संख्येत सुमारे 20 टक्के घट होणार आहे. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.

“वेगाने बदलणाऱ्या उद्योगात ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता यावी यासाठी आम्ही आमचे मनुष्यबळ, गुंतवणूक आणि संसाधने महत्त्वाच्या क्षेत्रांवर केंद्रित करत आहोत. आमचा व्यवसाय झपाट्याने बदलत आहे आणि त्यानुसार कंपनीची रचनाही बदलणे आवश्यक आहे,” असे कोलमन यांनी म्हटले. दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कर्मचारी कपात यांच्यात थेट संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “आज रद्द करण्यात आलेल्या पदांची जागा एआय घेत नाही. मात्र, एआयमुळे कंपनीतील काम करण्याची पद्धत वेगाने बदलत आहे,” असे त्या म्हणाल्या.

याशिवाय, गेमिंग व्यवसायातील काही स्टुडिओ स्वतंत्र व्यवस्थापनाखाली चालवण्याचा निर्णयही कंपनीने घेतला आहे. व्यवस्थापन रचना अधिक सुलभ करण्याबरोबरच कंटेंट, हार्डवेअर, प्लॅटफॉर्म आणि सेवांचे कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठीही बदल करण्यात येणार आहेत. एमी कोलमन यांनी या बदलांची ही अखेरची फेरी नसल्याचे संकेत दिले. “हा बदलांचा केवळ प्रारंभ आहे. व्यवसायाच्या गरजेनुसार पुढील काळात कंपनीच्या इतर विभागांमध्येही अशाच प्रकारचे बदल केले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.