
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. वारंवार सरकारचे उंबरठे झिजवूनही प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्याने राज्यातील शिक्षक मध्यवर्ती संघटनांनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली आहे. नियुक्त शिक्षकांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी ३० जुलैपर्यंत राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण उपसंचालक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना दिले आहेत. मात्र, शिक्षकांना वारंवार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व इतर अशैक्षणिक कामांवर पाठवले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे नुकसान होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केला आहे. शिक्षकांना अशा अशैक्षणिक कामांमधून पूर्णपणे मुक्त करावे, अशी मागणी शिक्षक संघटनेने केली होती. परंतु, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने उद्या शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात शैक्षणिक कामकाज बंद
शिक्षकांच्या या राज्यव्यापी आंदोलनात संपूर्ण राज्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, शैक्षणिक कामकाज बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षकांना देण्यात आलेली अशैक्षणिक कामे तत्काळ थांबवावीत, अशी मागणी शासनाकडे केली असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी सांगितले.




























































