
मुसळधार पावसामुळे कर्जतच्या ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाली, पहाटे नेरळ स्थानकाजवळ पाडागेट परिसरात मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळावर पाणी साचले. त्यामुळे नेरळ-कर्जतदरम्यानची रेल्वे सेवा पाच तास ठप्प झाली होती. हे पाणी ओसरल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली. पण उशिरापर्यंत गाह्या विलंबाने धावत होत्या. लोकलसह लांबपल्ल्याच्या गाड्यादेखील खोळंबल्या. धो धो पडणाऱ्या पावसाने रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले असून रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पाडागेट परिसरात तुफान पावसामुळे पहाटे दोनच्या सुमारास अचानक पाण्याचा जोर वाढला आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. काही वेळेतच नदीने रौद्ररूप धारण केल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. परिणामी अडीच वाजता मुंबईकडे जाणारी पहिली लोकलही रद्द करावी लागली. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या पावसाचा फटका नेरळ पूर्वेतील चंचेचाळ परिसरालाही बसला. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
सकाळी सवाआठला पहिली लोकल धावली
रेल्वे प्रशासनाने पाडागेट परिसरात साचलेल्या पाण्याचा जेसीबीच्या सहाय्याने निचरा केला. त्यानंतर सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी मुंबईच्या दिशेने पहिली लोकल सोडण्यात आली. पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू असताना परिसरातील पिण्याची पाइपलाइन फुटली असल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.



























































