
वादळी पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून तीन नंबरचा बावटा कायम असल्याने एलिफंटा, जेएनपीए, मोरा, करंजा येथील लाँच वाहतूक ठप्प आहे. त्याचा पर्यटनावर गंभीर परिणाम झाला असून व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट आले आहे. जलवाहतूक बंद असल्याने लाँचचे चालक, छोटे व्यावसायिक, हॉटेल्स अशा उद्योगांनाही मोठा फटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तुफान पाऊस, वादळी वारे आणि समुद्रात उसळणाऱ्या लाटा याचा परिणाम जलवाहतुकीवर झाला आहे. धोक्याचा इशारा दिल्यामुळे गेट वे ते एलिफंटा, भाऊचा धक्का ते जेएनपीए, मोरा ते भाऊचा धक्का आणि करंजा ते रेक्स ही वाहतूक बंद करावी लागली आहे. गेट वे ऑफ इंडियातून एलिफंटा येथे पावसाळी हंगामातदेखील दररविवारी २० ते २५ लाँच सोडण्यात येतात. त्यामुळे जागतिक किर्तीचे एलिफंटा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.
३० मिनिटांच्या समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून हार्बरसाठी दररोज २५०० ते ३००० पर्यटक येतात. मात्र सर्वच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आल्याने दररोज होणारी पर्यटन वाहतूक गुरुवारपासूनच पुरती ठप्प झाली आहे. त्यामुळे लौंचमालकांचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती गेट वे एलिफंटा जलवाहतूक संस्थेचे अध्यक्ष इक्बाल मुकादम यांनी दिली.
कामगारांची गैरसोय
लाल बावट्यामुळे जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे दोन हजार प्रवासी व कामगारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. बोटी बंद असल्याने प्रवासी व कामगारांना रेल्वे, एसटी, बस, खासगी वाहनाने कामाच्या ठिकाणी पोहोचण्याची वेळ आली आहे.
नागोठण्यात तिसऱ्या दिवशी पुराचा मुक्काम
अंबा नदी कोपल्याने नागोठणे गावातील घराघरांमध्ये पाणी शिरले असून बुधवारी तिसऱ्या दिवशीही पुराचा मुक्काम कायम राहिला, एसटी स्थानकात अजूनही पाणी असून छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठ, कोळीवाडा यांसह विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. नागोठणे गावात येणारे तीनही मुख्य रस्ते बंद असून घरात पुराचे पाणी असल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली.
डहाणूत घर कोसळून ८ जखमी
मुसळधार पावसामुळे सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खुबरोद पाहा येथे मध्यरात्री एकच्या सुमारास यशवंत सापटा या आदिवासी कुटुंबाचे घर कोसळले. त्यात आठ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेत त्यांचा सर्व संसार मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला.
भिवंडीत विजेच्या खांबावरून उडी
भिवंडीतील कामवारी नदी परिसरात एका युवकाने विजेच्या उंच खांबावर चढून थेट पाण्यात उडी मारली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या स्टंटबाजाचे नाव मात्र समजू शकले नाही.
‘देवदूता’वरच काळाचा घाला
मुसळधार पावसात खंडाळा घाटामध्ये मदतीसाठी भावलेल्या ‘देवदूता’वरच काळाने घाला घातला. झाड बाजूला करताना ते थेट अंगावर पडल्याने २२ वर्षीय अमन मुजावर या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. शिळगाव येथे राहणारा अमन याला खंडाळा घाटात रस्त्यावर भले मोठे झाड व दरड कोसळून रस्ता बंद झाल्याचे समजताच त्याने तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेतली. रस्ता बंद झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू होते. अमन बाने लगेच भरपावसात मदतकार्य सुरू केले. घाटातील रस्त्यामध्ये पडलेले झाड आपल्या पिकअप वाहनाला बांधले आणि ते बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू केला, त्याचवेळी झाडाची रस्सी सुटली आणि ते झाड थेट त्याच्या अंगावर कोसळले.
रेवदंड्यात रस्ताच वाहून गेला
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या बेरोंडा गावातील रस्ताच बाहून गेला आहे. समुद्राकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असून तीन फूट माती वाहून गेली आहे. त्यामुळे समुद्रातून होड्या बाहेर काहण्यासाठी कसे जायचे, असा प्रश्न मच्छीमारांपुढे उभा ठाकला आहे.
४५ गाईची सुटका
कर्जत तालुक्यातील दहिवली येथे एका फार्म हाऊसमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ४५ गाई अडकल्या होत्या. मात्र प्रशासनाने धाव घेऊन या गाईंची सुखरूप सुटका केली तर शेलू येथील केवीके नगर परिसरातील नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलबले आहे.



























































