
ग्राहकांच्या संमतीशिवाय ‘स्मार्ट मीटर’ची जोडणी थांबवा; तसेच जबरदस्तीने बसविलेले मीटर त्वरित काढून घ्यावेत, अन्यथा महावितरणच्या मुख्य कार्यालयासह शहरातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून देण्यात आला. याप्रकरणी महावितरणचे शहर मध्य विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश चांदणे यांना निवेदन देण्यात आले.
नव्याने स्मार्ट मीटर अतिशय घाईगडबडीत आणि ग्राहकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने बसविण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे. याबाबत कमालीची नाराजी आणि तीव्र असंतोष नागरिकांमध्ये दिसून येत आहे. याबाबत शहरातील नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे तक्रारी नोंदविल्या. अपार्टमेंटसह प्रत्येकाच्या घरी, झोपडपट्टी परिसरात परस्पर स्मार्ट मीटर बसविले आहेत. या मीटरमुळे बिलामध्ये मोठी तफावत दिसून आल्यानंतर स्मार्ट मीटर बसवून गेल्याचे समजून येत आहे. कारण नसताना आणि विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. मीटर बसविण्याचा ठेका ज्या ठेकेदारांना देण्यात आलेला आहे, तो त्वरित थांबविण्यात यावा, तशा स्वरूपाचा कार्यालयीय आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हा महिला संघटिका व महानगरपालिकेच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, शहरप्रमुख विशाल देवकुळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.



























































