कॉल रेकॉर्डिंग काढा भाजपवालेच निघतील! देणगी चोरीप्रकरणी अखिलेश यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या कथित देणगी घोटाळ्याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे, परंतु देणग्यांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठा दावा केला आहे. देणग्या चोरणाऱ्यांची कॉल रेकॉर्डिंग तपासली तर त्यातील 99 टक्के लोक हे भाजपवाले निघतील, असा टोला अखिलेश यादव यांनी गुरुवारी लगावला.

राममंदिरातील देणग्यांमध्ये झालेल्या अफरातफरीची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे, परंतु कारवाई केवळ छोटय़ा कर्मचाऱ्यांवर होत आहे. मोठय़ा पदांवर बसलेल्या जबाबदार लोकांना वाचवले जात आहे. चंपत राय यांचा उल्लेख एसआयटीच्या अहवालामध्ये नाही. त्यांना कशामुळे वाचवले जात आहे?   असे अखिलेश यादव म्हणाले.

देणगीचा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला

आरोपी अविनाश शुक्ला याने राम मंदिरातून चोरलेला पैसा शेअर बाजारात गुंतवला आहे. तसेच तो हे पैसे सहकाऱ्यांना आणि नातेवाईकांना व्याजाने देत असायचा. बुधवारी पोलिसांनी लवपुश मिश्रा आणि करुणेश पांडे यांना त्यांच्या घरी नेऊन तिथेही झडती घेतली होती. आरोपींच्या नातेवाईकांची 30 बँक खाती गोठवली आहेत. बुधवारी करुणेश पांडे, अनुकल्प मिश्र आणि लवपुश या तिघांना पोलिसांनी 40 तासांच्या रिमांडवर घेतले आहे.