
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत हा प्रश्न आता राष्ट्रीय राहिला नसून, आंतरराष्ट्रीय बनला आहे. मोदी जिथे जातात तिथे हा प्रश्न विचारला जात आहे. नॉर्वेनंतर आज न्यूझीलंडमध्येही एका पत्रकाराने हिंदुस्थानच्या परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला. या अधिकाऱ्याने ‘डिप्लोमॅटिक’ उत्तर देऊन वेळ मारून नेली. मात्र यानिमित्ताने हा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.
तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले नरेंद्र मोदी हे सध्या न्यूझीलंडमध्ये आहेत. त्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी हिंदुस्थानी परराष्ट्र अधिकारी रुद्रेंद्र टंडन यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ‘मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे का जात नाहीत,’ असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांना केला. या अनपेक्षित प्रश्नावर टंडन गांगरले. सुरुवातीला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. मात्र नंतर मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल सांगून यावर पडदा टाकला.
त्यांचा भर थेट संवादावर
रुद्रेंद्र टंडन म्हणाले, ‘एक नोकरशहा या नात्याने मी नरेंद्र मोदींच्या राजकीय दृष्टिकोनाबद्दल बोलणे योग्य नाही. मात्र त्यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. ते अस्सल हिंदुस्थानी राजकारणी आहेत. सर्वसाधारणपणे हिंदुस्थानातील राजकारणी मतदारांशी थेट संपर्क ठेवून असतात. मोदींचेही तसेच आहे. ते जनतेशी थेट संवाद साधणे पसंत करतात. त्यासाठी त्यांना मध्यस्थ नको असतो.’




























































