
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीत असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर सात महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोल नाक्याजवळ घडला. याप्रकरणी ७० वर्षीय ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नंदा पवार (६०), माधवी सालगरे (५५) आणि राजश्री भोसले (५५) अशी मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. शांता अलकोपर (७०), कासाबाई गस्ते (७०), लक्ष्मा गडदे (४५), अक्काताई कोळी (६०), शैलजा जगताप (५८), गीताबाई हंकारे (६५) व मंगल पाटील (६५) या महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पालखीत नांदेड, लोहा तालुक्यातील ह.भ.प. रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांची दिंडी सहभागी आहे. दिंडीतील ट्रक आज सकाळी सासवड-जेजुरी रस्त्यावरून जात होता. सासवडजवळील बोरावकेमळा परिसरात वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपात दुभाजक टाकले होते. सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावातील सात महिला वारकरी तेथे थांबल्या असताना बेलसर टोल नाक्याजवळ ट्रकचालकाने त्यांना धडक दिली.
ट्रकचालक ताब्यात; प्रकृती अस्वस्थ असल्याचे उघड
पोलिसांनी ७० वर्षीय ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली असता तो स्वतः आजारी (अत्यवस्थ) होता. त्याने सर्दी-तापासाठी औषधे घेतली होती. दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या (ओलांडून जाण्याच्या) प्रयत्नात त्याने ट्रक अचानक डाव्या बाजूला वळवला, ज्यामुळे हा अपघात घडला.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
या भीषण अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या वतीने अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.





























































