
गणेशमूर्तीला देण्यात येणाऱया घातक रंगामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्यामुळे या वर्षी बाप्पाचे रंगकाम पर्यावरणपूरक रंगानीच केले जाणार आहे. यासाठी पालिका मूर्तिकारांना रंगाचा मोफत पुरवठा करणार आहे. सध्या वापरात येणाऱया रंगांमध्ये लिड, कॅडमिअम, क्रोमिअम आणि मर्क्युरी यासारख्या घातक धातूंमुळे जलचरांना धोका पोहोचत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वांचा लाडका गणेशोत्सव दोन महिन्यांवर आल्याने गणेश चित्रशाळांमध्ये मूर्ती घडवण्याची लगबग सुरू आहे. गणपती मूर्ती शाडूमाती, कागद, धातू, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आदी घटकांपासून बनवण्यात येत आहेत. हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मूर्तिकारांना आधीपासूनच मोफत शाडूमाती देण्यात येत आहे. मात्र मूर्तिकारांकडून वापरण्यात येणाऱया रंगांमधील घातक धातूंमुळे मूर्ती विसर्जनानंतर हे रंग पाण्यात मिसळल्याने जलचरांना धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरणपूरक रंगपुरवठय़ाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱया स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
मूर्तिकारांना 25 हजार 400 लिटर पर्यावरणपूरक रंगांचे वाटप करण्यात येईल. या रंगाचा पुरवठा, वाहतूक आणि विभागनिहाय वाटपासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या.
यामध्ये लघुत्तम निविदाकार मे. एकता एंटरप्रायझेस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी पालिका एक कोटी 63 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी उपायुक्त (परिमंडळ-2) यांच्या अर्थसंकल्पीय शिर्षानिधीतून 70 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.































































