
आपल्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी अनेक संघटना, पक्ष ठाणे महापालिकेसमोर निदर्शने, उपोषण, आंदोलन करत असतात. मात्र यापुढे ही जागा बदलली जाणार आहे. सर्व संघटनांना आता ‘परमार्थ निकेतन ‘समोर निदर्शने करण्याची परवानगी देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात येणार आहे. महापालिकेसमोरची जागा शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनाची जागा बदलली जाणार आहे.
ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर येणारे मोर्चे, धरणे, आंदोलने, उपोषण यामुळे अनेकदा वाहतूककोंडी होते. तसेच त्याचा कार्यालयीन कामकाजावरदेखील परिणाम होतो. अनेकदा सुरक्षारक्षक व आंदोलनकर्ते यांच्यात बाचाबाचीही
होत असते. याचा विचार करून पालिका मुख्यालयाऐवजी आता शंभर मीटर अंतरावर असलेल्या ‘परमार्थ निकेतन’ समोरील चौक आंदोलनासाठी अधिकृत जागा म्हणून निश्चित केली जाणार आहे. या चौकात मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच शिष्टमंडळाला पालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याची मुभासुद्धा मिळेल.
महापालिकेच्या गेटपासून १०० मीटरचा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित केला जाणार आहे. यासंदर्भात २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रशासनाने परिपत्रक काढले होते. आता २० जुलै रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात येणार आहे. तेथे अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.





























































