
मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील कशेडी-वझरवाडी येथे शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विद्युत दिव्याच्या खांबावर जोरदार आदळली. धडक इतकी जोरदार होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले असून कारमधील चारही प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली २४ तास अपघात मदतीसाठी सज्ज असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्रीनरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज धाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. कशेडी वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून प्राथमिक मदत देण्यात आली. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले.
या अपघातात गोवा येथील मनीषा केशव खवणेकर (वय ४४), केशव एकनाथ खवणेकर (वय ५१), स्वरा केशव खवणेकर (वय ५) आणि सुजाता महादेव कोचरेकर (वय ५७) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास कशेडी वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे.




























































