बाकावर डोके खाली टेकवले नाही, नर्सरीतील विद्यार्थ्याला क्लास मॉनिटरकडून मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लखनऊमधील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षिका वर्गात नसताना नर्सरीमध्ये शिकणाऱ्या पाच वर्षांच्या विद्यार्थ्याला क्लास मॉनिटरने वर्गातच सुमारे आठ मिनिटे मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा आणि ओरखडे उमटले आहेत. ‘एएलएस अकादमी’ मध्ये बुधवारी ही घटना घडली. ही घटना वर्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या फुटेजमध्ये एक शिक्षिका आणि सुमारे 18 विद्यार्थी वर्गात दिसत आहेत. एका मिनिटानंतर, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना डोकं डेस्कवर खाली ठेवण्यास सांगितले आणि क्लास मॉनिटरला त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची सूचना देऊन ती वर्गाबाहेर गेली. शिक्षिका बाहेर जाताच, काही विद्यार्थ्यांनीही डोके वर करण्याचा प्रयत्न केला असता, मॉनिटरने त्यांना मारले.

यानंतर पीडित विद्यार्थ्याने डोके वर केले असता ती धावत त्याच्या डेस्ककडे गेली आणि त्याला किमान चार वेळा थप्पड मारली. वेदनेमुळे तो मुलगा उठला असता, तिने त्याचे डोके बळजबरीने खाली दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मुलगा रडू लागला आणि त्याने डोके वरच ठेवले. तिने पुन्हा त्याचे डोके खाली दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याला थप्पड मारली.

सुमारे एका मिनिटानंतर तो मुलगा पुन्हा उठला आणि एका दरवाजाकडे धावला, पण तिने त्याला अडवले. तिने त्याला ओढत आत आणले, पुन्हा थप्पड मारली आणि आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर तो मुलगा दुसरा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्या मुलीने थप्पड मारण्यापूर्वी तो तिथे काही मिनिटे उभा राहिला. त्यानंतर त्याला ओढत त्याच्या जागेवर नेण्यात आले. आपल्या जागेवर परतलेल्या त्या मुलाला ती पुन्हा मारहाण करू लागली. त्यानंतर 10 मिनिटांनंतर शिक्षिका परत आली.

मुलगा घरी गेला तेव्हा त्याच्या पालकांना त्याचा सुजलेला चेहरा व जखमा दिसल्या. त्यांनी तातडीने शाळेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता सर्व प्रकार उघडकीस आला. त्या मॉनिटरला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.