चिमुकलीची हत्या करणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, शिवसैनिकांचे पेण पोलिसांना साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पाटणेश्वर गावावजळील काजुर्ले आदिवासी वाडीत घडलेल्या या घटनेने अवघा पेण तालुका हादरून गेला. चिमुकलीची हत्या करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. लवकरात लवकर नराधमांना पकडून त्यांना शिक्षा ठोठावली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

पाटणेश्वर गावाजवळच काजुर्ले आदिवासी वाडी आहे. १३ जुलै रोजी तिथे राहणाऱ्या चिमुकलीला ती झोपेत असतानाच आरोपीने उचलून निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. एवढेच नव्हे तर नराधमाने चिमुकलीला धारदार शस्त्रांनी ठार मारले. मुलगी रात्री घरी परतली नाही म्हणून नातेवाईकांनी नजीकचे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या गंभीर घटनेची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल व उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी घेतली.

चिमुकलीवर झालेला अमानुष अत्याचार प्रकरण लवकरात लवकर फास्टट्रॅक कोर्टात न्यावे व दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेना पेण तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्यासह महिला जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे, उपतालुकाप्रमुख चेतन मोकल, शहर संपर्कप्रमुख विजय पाटील, उपशहरप्रमुख समीर साठी, नगरसेवक सद्दाम आवासकर, राकेश मोकल, संजय पानसे आदी उपस्थित होते.